
आता सरकारी दवाखान्यांवर ‘एआय’ची नजर ! सीसीटीव्ही कॅमेऱ्यांतून होणार रुग्णालयांची निगराणी; बुलढाण्यासह या ११ जिल्ह्यांचा तिसऱ्या टप्प्यात समावेश
MH 28 News Live / बुलढाणा : राज्यातील सरकारी रुग्णालयांच्या कारभारावर आता तंत्रज्ञानाची नजर राहणार आहे. रुग्णालयांमधील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती, रुग्णांची ये-जा, स्वच्छता, आरोग्य सेवांचा दर्जा तसेच अग्निसुरक्षेसह विविध सुविधांवर देखरेख ठेवण्यासाठी राज्य सरकारने केंद्रीकृत रिअल-टाइम मॉनिटरिंग प्रणाली लागू करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे सरकारी रुग्णालयांतील कामकाजावर वरिष्ठ स्तरावरून लक्ष ठेवणे शक्य होणार आहे.

बुलढाण्यासह ११ जिल्ह्यांची निवड
या प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्यात यवतमाळ, सांगली, बुलढाणा, भंडारा, अहिल्यानगर, अमरावती, ठाणे, सातारा, रायगड, पुणे आणि नाशिक या ११ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमधील जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अखत्यारीतील आरोग्य संस्थांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. त्यामध्ये इंटरनेटची उपलब्धता, आवश्यक बँडविड्थ आणि सीसीटीव्ही यंत्रणेची सद्यस्थिती तपासली जात आहे. रुग्णालयांमधील निवडक ठिकाणी कॅमेरे बसवून त्यांना केंद्रीकृत देखरेख प्रणालीशी जोडण्यात येणार आहे.
कारभार सुधारण्याची अपेक्षा
या प्रणालीमुळे रुग्णालयांतील डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर लक्ष ठेवण्याबरोबरच स्वच्छता, रुग्णसेवा आणि विविध प्रशासकीय व्यवस्थांमधील त्रुटी शोधणे शक्य होणार आहे. विशेषतः रुग्णालयांमध्ये वेळेवर सेवा मिळते की नाही, कर्मचारी कर्तव्यावर उपस्थित आहेत की नाहीत आणि स्वच्छता व अग्निसुरक्षेच्या नियमांचे पालन होते की नाही, यावर देखरेख ठेवण्यास मदत होईल. मात्र, केवळ सीसीटीव्ही आणि एआयच्या निगराणीने आरोग्य व्यवस्थेचा दर्जा सुधारणार नाही, तर डॉक्टरांची उपलब्धता, औषधांचा पुरवठा, आवश्यक वैद्यकीय उपकरणे आणि रुग्णांशी संवेदनशीलतेने वागणारी यंत्रणा यांनाही प्राधान्य द्यावे लागणार आहे. त्यामुळे या तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अंमलबजावणीत कितपत उपयोग होतो, याकडे आता लक्ष लागले आहे.



