♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

दुष्काळाच्या दाहकतेने शेतकऱ्यांचा आक्रोश; सरणावर बसून सरकारला जागे करण्याचा प्रयत्न

 

MH 28 News Live / मलकापूर : बुलढाणा जिल्ह्यात यंदा पावसाने पाठ फिरवल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले असून ग्रामीण भागात दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस तीव्र होत आहे. पावसाअभावी पिके करपून गेली, विहिरी आणि जलस्रोत आटण्याच्या मार्गावर आहेत आणि शेतकऱ्यांसमोर पुढील हंगामाचेही संकट उभे ठाकले आहे. अशा परिस्थितीत सरकारी यंत्रणेकडून पाहणी दौरे सुरू असले, तरी प्रत्यक्ष मदतीची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांचा संयम आता संपत चालला आहे.

याच संतापातून मलकापूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश नेते निलेश नारखेडे यांनी सरणावर बसून आंदोलन सुरू केले. शेतकऱ्यांच्या व्यथा आणि दुष्काळाची तीव्रता सरकारच्या निदर्शनास आणून देण्यासाठी त्यांनी हे टोकाचे आंदोलन केले आहे. “शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. सरकारकडून केवळ पाहणीचे दौरे सुरू आहेत; मात्र प्रत्यक्ष मदत कधी मिळणार? शेतकऱ्यांनी आणखी किती सहन करायचे?” असा सवाल नारखेडे यांनी उपस्थित केला.

‘पाहणी नको, मदत हवी’ अशी भूमिका घेत आंदोलनकर्त्यांनी बुलढाणा जिल्हा संपूर्णतः दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी केली आहे. त्यासोबतच दुष्काळामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीपोटी सरसकट हेक्टरी एक लाख रुपयांची आर्थिक मदत तातडीने मंजूर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि वीजबिल माफी लागू करण्याची मागणीही आंदोलनातून करण्यात आली आहे.

दुष्काळाची तीव्रता केवळ आकडेवारीत मोजता येत नाही; त्यामागे उभ्या पिकासाठी केलेला खर्च, कर्जाचा वाढता बोजा, कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची चिंता आणि पुढील हंगामाची अनिश्चितता दडलेली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या पाहणी दौऱ्यांकडे आशेने पाहणाऱ्या शेतकऱ्यांना आता प्रत्यक्ष मदतीची प्रतीक्षा आहे. ‘पाहणी झाली, आता पंचनामे आणि मदत कधी?’ हा प्रश्न ग्रामीण भागात अधिक तीव्र होत आहे.

दरम्यान, नारखेडे यांच्या आंदोलनाची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि शेतकरी मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले. प्रशासनाकडून आंदोलकांशी चर्चा करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. सरणावर बसून करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे मलकापूरसह बुलढाणा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. “शेतकरी मरतोय, तरी सरकार फक्त पाहणी करत राहणार का? नाहीतर आम्ही पागल आहोत!” या संतप्त भावनेतून व्यक्त झालेला हा आक्रोश आता प्रशासनापर्यंत प्रत्यक्ष मदतीच्या रूपाने पोहोचतो का, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129