
सरोवर वाढले, मंदिर बुडले !कमळजा मातेसाठी लोणार पेटले ! संताप्त नागरिकांनी केला चक्काजाम
MH 28 News Live / लोणार : जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या वाढत्या जलपातळीचा फटका आता या परिसरातील ऐतिहासिक आणि धार्मिक वारशाला बसू लागला आहे. सरोवरातील पाण्याची पातळी सातत्याने वर जात असल्याने प्राचीन कमळजा माता मंदिर पूर्णपणे जलमय झाले असून, या गंभीर परिस्थितीने लोणारकरांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप करत २१ सप्टेंबर रोजी संपूर्ण लोणार शहराने एकजूट दाखवत सर्वपक्षीय कृती समितीच्या नेतृत्वाखाली जोरदार चक्का जाम आंदोलन केले.
सकाळपासूनच शहरातील प्रमुख चौक आणि रस्त्यांवर नागरिकांची मोठी गर्दी जमू लागली होती. आंदोलनात महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक तसेच लहान मुलांचाही मोठ्या संख्येने सहभाग होता. हातात विविध मागण्यांचे फलक घेत नागरिकांनी प्रशासनाच्या कारभाराविरोधात आवाज बुलंद केला. ‘कमळजा माता मंदिराचे संरक्षण करा’ आणि ‘लोणार सरोवर वाचवा’ अशा घोषणांनी परिसर अक्षरशः दणाणून गेला. मंदिराला पाण्याच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी यावेळी जोरकसपणे करण्यात आली.
या आंदोलनाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे लोणारच्या प्रश्नावर राजकीय मतभेद बाजूला ठेवून विविध पक्षांचे नेते आणि पदाधिकारी एकत्र आले. सर्वपक्षीय सहभागामुळे आंदोलनाला व्यापक स्वरूप प्राप्त झाले. उपस्थित लोकप्रतिनिधींनी आपल्या भाषणातून पुरातत्त्व विभाग तसेच स्थानिक प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. लोणार सरोवरासारख्या जागतिक महत्त्वाच्या नैसर्गिक आणि ऐतिहासिक ठेव्याच्या संरक्षणासाठी केवळ कागदी कार्यवाही न करता प्रत्यक्ष उपाययोजना करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सरोवरात बाहेरून येणाऱ्या पाण्याचे प्रमाण वाढल्यामुळे जलसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. परिणामी कमळजा माता मंदिर पाण्याखाली गेले असून, सरोवराच्या विशिष्ट अल्कधर्मी परिसंस्थेलाही संभाव्य धोका निर्माण झाला आहे. सरोवराभोवतालच्या परिसरावरही या वाढत्या पाण्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे पाण्याच्या वाढीचे कारण शोधून त्यावर शास्त्रीय पद्धतीने कायमस्वरूपी उपाय करावा, तसेच जलपातळी नियंत्रित करण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.
चक्का जाम आंदोलनामुळे लोणार शहरातील प्रमुख मार्गांवरील वाहतूक अनेक तास विस्कळीत झाली. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. आंदोलनाची तीव्रता आणि नागरिकांचा वाढता आक्रोश लक्षात घेऊन संबंधित प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलकांशी चर्चा केली.
यावेळी सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले. सरोवरातील वाढत्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी तसेच कमळजा माता मंदिराचे संरक्षण करण्यासाठी तातडीने प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. प्रशासनाने आगामी काही दिवसांत ठोस हालचाल केली नाही, तर यापुढे अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा आणि गरज पडल्यास बेमुदत आंदोलन सुरू करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला..
लोणार सरोवर हे केवळ पर्यटनस्थळ नसून नैसर्गिक, ऐतिहासिक, धार्मिक आणि वैज्ञानिकदृष्ट्या महत्त्वाचा वारसा आहे. त्यामुळे त्याच्या संरक्षणासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलण्याची मागणी आता अधिक तीव्र झाली आहे



