♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

अवैध वृक्षतोड प्रकरणात तिसऱ्या आरोपीला अटक ! तीन दिवसांची वनकोठडी; १४५ सागवान वृक्षांच्या तोडप्रकरणी वनविभागाची कारवाई

 

MH 28 News Live / डोणगाव : बुलढाणा वनविभागांतर्गत घाटबोरी वनपरिक्षेत्रातील भोसा बिटमध्ये झालेल्या अवैध सागवान वृक्षतोड प्रकरणात वनविभागाने तिसऱ्या आरोपीला अटक केली आहे. अमीर खान शौकत खान पठाण (रा. सुलतानपूर, ता. लोणार, जि. बुलढाणा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याला मेहकर येथील प्रथम न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची वनकोठडी सुनावली आहे

 

घाटबोरी वनपरिक्षेत्रातील भोसा बिटमधील वनकक्ष क्रमांक १८१ तसेच महसूल ई-क्लास गट क्रमांक ५३३ या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अवैध वृक्षतोड झाल्याचे उघडकीस आले होते. यामध्ये वनक्षेत्रातील १४५ आणि महसूल क्षेत्रातील ७५ अशा एकूण २२० सागवान वृक्षांची कत्तल करण्यात आली होती. या प्रकरणी घाटबोरी वनक्षेत्र अधिकाऱ्यांनी २ ऑक्टोबर २०२६ रोजी वनगुन्हा क्रमांक ०३/२०२६ दाखल केला होता. तसेच महसूल ई-क्लास क्षेत्रातील वृक्षतोडीप्रकरणी डोणगाव पोलीस ठाण्यातही स्वतंत्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या प्रकरणाच्या तपासादरम्यान आतापर्यंत दोन मुख्य आरोपींसह अन्य १२ सहआरोपींना पकडण्यात आले असून, गुन्ह्यात वापरण्यात आलेले जेसीबी, हायड्रा, टेम्पो आणि ट्रॅक्टर अशी वाहनेही जप्त करण्यात आली आहेत. तपासात अवैधरीत्या तोडलेल्या सागवान लाकडाची वाहतूक अमीर खान पठाण यांच्या मालकीच्या एमएच २८ बीए ३१३७ क्रमांकाच्या ट्रकद्वारे झाल्याचे निष्पन्न झाले. चौकशीसाठी ट्रक ताब्यात देण्याबाबत संबंधित मालकाला सूचित करण्यात आले होते. मात्र, त्यांनी त्यास नकार दिल्याने तसेच तपासात सहकार्य न केल्याच्या कारणावरून भारतीय वन अधिनियम १९२७ मधील कलम ४१ व ४२ अन्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.

या प्रकरणाचा पुढील तपास सहायक वनसंरक्षक वैभव काकडे (मेहकर) करीत आहेत. ही कारवाई मुख्य वनसंरक्षक ज्योती बॅनर्जी (प्रादेशिक, अमरावती) आणि उपवनसंरक्षक जमीर मुनीर शेख (बुलढाणा) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये सहायक वनसंरक्षक वैभव काकडे, वनक्षेत्र अधिकारी रवींद्र सातपुते, डोणगावचे सहायक पोलीस निरीक्षक जी. ए. इंगोले, पोलीस उपनिरीक्षक विजय आजमीरे तसेच वन व पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129