
खव्याचा काळाबाजार… डोणगावात चिंतामणी डेअरीवर FDAचा छापा; दूध – खव्याचे नमुने ताब्यात, अहवालाकडे लक्ष
MH 28 News Live / डोणगाव : येथील चिंतामणी दूध डेअरीवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) २२ सप्टेंबर रोजी सकाळी धडक कारवाई केली. अचानक करण्यात आलेल्या या तपासणीमुळे परिसरातील दुग्ध व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. कारवाईदरम्यान डेअरीतील दूध आणि खव्याचे नमुने ताब्यात घेऊन ते तपासणीसाठी शासकीय प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.
नागरिकांना सुरक्षित, शुद्ध आणि दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून विविध ठिकाणी तपासणी मोहीम राबवली जात आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून मेहकर येथील अन्न सुरक्षा अधिकारी अक्षय भोपाळे यांनी चिंतामणी दूध डेअरीची तपासणी केली.
तपासणीदरम्यान दूध व खव्याचे नमुने नियमानुसार सील करण्यात आले. त्यानंतर हे नमुने शासकीय प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठवण्यात आले आहेत. या नमुन्यांच्या तपासणीचा अहवाल आल्यानंतरच संबंधित खाद्यपदार्थांच्या दर्जाबाबत स्पष्टता होणार आहे.
प्रयोगशाळेच्या अहवालात दूध किंवा खव्यामध्ये भेसळ, निकृष्ट दर्जा अथवा अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती अन्न सुरक्षा अधिकारी अक्षय भोपाळे यांनी दिली.
FDAच्या या अचानक कारवाईमुळे डोणगावसह परिसरातील दूध डेअऱ्या आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. विशेषतः दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या गुणवत्तेबाबत ग्राहकांमध्येही या कारवाईमुळे चर्चा सुरू झाली आहे. आता प्रयोगशाळेच्या अहवालात नेमके काय निष्पन्न होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.



