
बुलढाणा–पोहरादेवी थेट बससेवेला प्रारंभ; भाविकांचा प्रवास होणार सुकर; अनेक वर्षांची मागणी अखेर पूर्ण
MH 28 News Live / बुलढाणा : बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज, जगदंबा माता, सामकी माता (उमरीगड) तसेच डॉ. रामराव महाराज यांचे तीर्थक्षेत्र असलेल्या पोहरादेवी येथे जाणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील भाविकांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बुलढाणा आगारातून पोहरादेवीसाठी थेट नियमित बससेवा सुरू करण्यात आली असून, या सेवेचा विधिवत शुभारंभ धर्मगुरूंच्या हस्ते करण्यात आला.
बुलढाण्यातून दुपारी १ वाजता सुटणार बस
बुलढाणा आगारातून सुरू करण्यात आलेली ही निवासी बस दररोज दुपारी १ वाजता बुलढाण्यातून पोहरादेवीकडे रवाना होणार असून सायंकाळी ७ वाजता पोहरादेवी येथे पोहोचणार आहे. त्यानंतर सकाळी पोहरादेवी येथून बुलढाण्यासाठी बस रवाना होईल. पोहरादेवी, धानोरा, वाशीम, मालेगाव, मेडशी, पातूर, बाळापूर, पळशी, आंबेटाकळी, लाखनवाडा, चिंचपूर मार्गे ही बस बुलढाणा येथे पोहोचणार आहे. त्यामुळे या मार्गावरील अनेक गावांतील प्रवाशांनाही या सेवेचा लाभ मिळणार आहे.
धर्मगुरूंच्या हस्ते बसचे पूजन
पोहरादेवी येथे या नव्या बससेवेचा शुभारंभ धर्मगुरू आ. बाबूसिंग महाराज राठोड, महंत गणेश महाराज, विश्वस्त गोपाल महाराज, सदाशिव चव्हाण तसेच मोठ्या संख्येने उपस्थित भाविक आणि प्रवाशांच्या उपस्थितीत झाला. धर्मगुरूंच्या हस्ते बसचे विधिवत पूजन करून नारळ फोडण्यात आला. यावेळी बसच्या चालक व वाहकाचा सत्कार करण्यात आला. नव्या बससेवेच्या स्वागतासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
भाविकांची अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली
बुलढाणा जिल्ह्यातून पोहरादेवी येथे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. मात्र थेट बससेवा उपलब्ध नसल्याने भाविकांना प्रवासादरम्यान अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे बुलढाणा येथून पोहरादेवीसाठी थेट बस सुरू करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. अखेर ही मागणी पूर्ण झाल्याने भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
पोहरादेवी येथे संत सेवालाल महाराजांसह विविध श्रद्धास्थानांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या हजारो भाविकांचा प्रवास आता अधिक सोयीचा होणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सुरू केलेल्या या थेट बससेवेचे भाविक आणि प्रवाशांकडून स्वागत करण्यात येत आहे.



