♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

पीक पेरा ऑनलाइनचा घोळ कायम; शेतकरी आक्रमक भरोसा भाग-१ व काळोना हद्दीतील शेतकऱ्यांचे भूमी अभिलेख कार्यालयात ठिय्या

 

MH 28 News Live / चिखली : खरीप हंगाम २०२६-२७ मधील पीक पेरा ऑनलाइन नोंदणीच्या प्रक्रियेत निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणींमुळे भरोसा भाग-१ व काळोना हद्दीतील शेतकरी संतप्त झाले आहेत. प्रत्यक्ष शेताचे लोकेशन दाखविण्याऐवजी ऑनलाइन प्रणालीवर दुसऱ्याच ठिकाणचे लोकेशन दिसत असल्याने अनेक शेतकऱ्यांना आपल्या शेतातील पिकांची ऑनलाइन नोंद करता येत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. ही समस्या यंदाची नसून मागील खरीप हंगामापासून कायम असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सन २०२५-२६ मध्येही भरोसा भाग-१ येथील शेतकऱ्यांना पीक पेरा ऑनलाइन नोंदविण्यासाठी तब्बल ५० किलोमीटर अंतरावरील भोरसा-बोरसे येथे जावे लागले होते. त्यावेळी संबंधित प्रशासनाच्या निदर्शनास समस्या आणून देण्यात आली होती. मात्र वर्षभराचा कालावधी उलटूनही तांत्रिक अडचणीचे कायमस्वरूपी निराकरण झाले नसल्याने यंदाच्या हंगामात पुन्हा शेतकऱ्यांसमोर तोच प्रश्न निर्माण झाला आहे.

काळोना हद्दीतील परिस्थिती आणखी गंभीर असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या भागातील एकाही शेतकऱ्याचा पीक पेरा ऑनलाइन होत नसल्याचा दावा करण्यात आला आहे. प्रत्यक्ष शेतात पिके उभी असतानाही ऑनलाइन अभिलेखात त्यांची नोंद होत नसल्याने भविष्यात विविध शासकीय योजनांच्या लाभावर परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. विशेषतः पीक विमा, दुष्काळी मदत, नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई तसेच अन्य शासकीय योजनांचा लाभ घेताना अडचणी निर्माण होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. या समस्येबाबत संबंधित अधिकारी, तहसीलदार तसेच भूमी अभिलेख विभागातील अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला. मात्र अद्याप समाधानकारक तोडगा निघाला नसल्याने अखेर शेतकऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे.

दि. २८ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजल्यापासून भूमी अभिलेख कार्यालयात युवासेना उपजिल्हाप्रमुख संतोष पाटील भुतेकर यांच्या नेतृत्वाखाली लोकशाही व शांततामय मार्गाने ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले. या आंदोलनात गणेशभाऊ ऊसर, समाधान ऊसर, सुधाभाऊ शिंदे, कृष्णा भुतेकर यांच्यासह भरोसा भाग-१ व काळोना हद्दीतील अनेक शेतकरी सहभागी झाले आहेत.

भरोसा भाग-१ व काळोना हद्दीतील तांत्रिक अडचण तातडीने दूर करून प्रत्येक शेतकऱ्याच्या प्रत्यक्ष शेताच्या अचूक लोकेशनवर पीक पेरा ऑनलाइन नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. तसेच भविष्यात अशी समस्या पुन्हा निर्माण होऊ नये, यासाठी कायमस्वरूपी तांत्रिक उपाययोजना करण्याची मागणीही करण्यात आली आहे. “मागील वर्षी ५० किलोमीटर दूर जाऊन पीक पेरा नोंदविण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. एक वर्ष उलटूनही समस्या कायम असेल तर शेतकऱ्यांनी पुन्हा त्याच त्रासाला का सामोरे जावे? प्रशासनाने तातडीने तांत्रिक अडचण दूर करून शेतकऱ्यांचा पीक पेरा ऑनलाइन करून द्यावा. जोपर्यंत ही समस्या कायमस्वरूपी सुटत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार,” अशी भूमिका संतोष पाटील भुतेकर यांनी व्यक्त केली. दरम्यान, प्रशासनाने या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन तांत्रिक अडचण दूर करावी आणि संबंधित सर्व शेतकऱ्यांचा पीक पेरा निर्धारित वेळेत ऑनलाइन नोंदवून द्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129