
प्रशासनाचा निर्लज्जपणा अन् पोलिसांची दादागिरी: शोले स्टाईल आंदोलनानंतरच जाग, पत्रकाराला धमकावणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई होणार का ?
MH 28 News Live / डोणगाव : हक्क मागण्यासाठी थेट पाण्याच्या टाकीवर चढावे लागणे, हीच मुळात या लाचार आणि झोपलेल्या प्रशासनाच्या तोंडावर सणसणीत चपराक आहे. नागापूर येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनलेला असताना आणि ‘जलजीवन मिशन’च्या नावाखाली निकृष्ट कामाचा खेळखंडोबा मांडला गेलेला असताना, अधिकारी मात्र गाढ झोपेत होते. अखेर गांधीजयंतीच्याच दिवशी शिवसेना (उबाठा) गटाचे विभाग प्रमुख दीपक गायकवाड आणि ग्रामस्थांनी पाण्याच्या टाकीवर चढून ‘शोले स्टाईल‘ आंदोलन छेडले, तेव्हा कुठे या निर्दयी यंत्रणेचे डोळे उघडले.
रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) अभावी पाणीपुरवठा धूळ खात पडला होता आणि वारंवार पाठपुरावा करूनही अधिकारी दाद देत नव्हते. पण आंदोलनाचा हिसका बसताच, याच प्रशासनाने दुपारी २ वाजता तातडीने नागापूर येथे नवीन विद्युत रोहित्र हजर केले. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता स्वामी यांनी येत्या चार दिवसांत पाणीपुरवठा पूर्ववत करण्याचे लेखी आश्वासन दिले, तेव्हा कुठे गायकवाड टाकीवरून खाली उतरले.
आंदोलन हाताळता येईना, तर राग पत्रकारावर काढला
एकीकडे प्रशासनाचा नाकर्तेपणा उघडा पडत असताना, दुसरीकडे पोलिसांची गुंडगिरी पाहायला मिळाली. नागापूर येथील या घटनेचे वृत्त संकलन करण्यासाठी गेलेले पत्रकार देविदास खनपटे यांना सहायक पोलीस निरीक्षक विजय अजमिरे यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत, “तुम्ही शांतता भंग करत आहात,” असा अजब दावा ठोकून उपस्थितांसमोर थेट धमकावले. स्वतःचे अपयश झाकण्यासाठी आणि आंदोलन हाताळता न आल्याच्या हताशेतून पोलिसांनी आपला राग पत्रकारावर काढला.
जरी या प्रकरणी ठाणेदार गणेश इंगोले यांनी दिलगिरी व्यक्त केली असली, तरी केवळ माफीने हे पाप धुतले जाणार नाही. पत्रकाराचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्या सहायक पोलीस निरीक्षक विजय अजमिरे यांच्यावर कडक प्रशासकीय कारवाई झालीच पाहिजे, अशी रोखठोक मागणी पत्रकार देविदास खनपटे यांनी केली आहे.
तसेच, अधिकाऱ्यांनी चार दिवसांत दिलेले आश्वासन पाळले नाही, तर पुन्हा यापेक्षा तीव्र आंदोलन छेडू, असा थेट इशाराही दीपक गायकवाड यांनी दिला आहे. आता चार दिवसांत पाणी मिळते की पुन्हा अधिकारी नेहमीप्रमाणे गाढ झोपतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.



