♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

राहूल बोंद्रे उद्या भाजपात येणार ! यावर आ. श्वेताताई महाले म्हणाल्या…

MH 28 News Live / चिखली : चिखलीच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवून आणणाऱ्या राहुल बोंद्रे यांच्या भाजप प्रवेशाची तारीख निश्चित झाली असून, या घडामोडीवर विद्यमान भाजप आमदार श्वेता महाले यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे २२ सप्टेंबर रोजी मुंबईत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. विशेष म्हणजे, चिखलीच्या राजकारणात आजवर परस्परविरोधी भूमिकांमध्ये दिसलेले राहुल बोंद्रे आणि श्वेता महाले आता एकाच राजकीय व्यासपीठावर येणार आहेत. त्यामुळे या पक्षप्रवेशाकडे चिखलीच्या राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले आहे.

‘आमच्यात वैयक्तिक भांडण कधीच नव्हते!’

राहुल बोंद्रे यांच्या भाजप प्रवेशाबाबत प्रतिक्रिया देताना आमदार श्वेता महाले यांनी एक महत्त्वाची बाब स्पष्ट केली. बोंद्रे आणि आपल्या कुटुंबामध्ये कधीही वैयक्तिक भांडण अथवा वाद नव्हता, असे त्यांनी सांगितले. दोन्ही बाजूंच्या राजकीय विचारधारा वेगळ्या असल्यामुळे राजकीय मतभेद होते; मात्र तेवढेच, असे महाले यांनी स्पष्ट केले.

भाजपची विचारधारा स्वीकारण्याचा निर्णय; स्वागतच!’

राहुल बोंद्रे यांनी भाजपची विचारधारा आणि हिंदुत्व स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाचे आपण स्वागतच करतो, अशी भूमिका श्वेता महाले यांनी मांडली. त्यामुळे बोंद्रे यांच्या पक्षबदलाकडे वैयक्तिक संघर्षाच्या दृष्टिकोनातून पाहण्याऐवजी राजकीय विचारधारेतील बदल म्हणून पाहण्याचा संदेश त्यांच्या प्रतिक्रियेतून मिळत आहे.

२२ सप्टेंबरला मुंबईत ‘हात’ सोडून ‘कमळ’ हाती

राहुल बोंद्रे यांचा भाजप प्रवेश २२ सप्टेंबर रोजी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या पक्षप्रवेश सोहळ्याला आपण मतदारसंघाची आमदार म्हणून उपस्थित राहणार असल्याचेही श्वेता महाले यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे चिखलीच्या राजकारणातील दोन प्रमुख चेहरे भाजपच्या एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत.

बोंद्रे यांच्या प्रवेशाने चिखलीत नवे राजकीय समीकरण ?

राहुल बोंद्रे यांचा भाजप प्रवेश हा केवळ एका नेत्याचा पक्षबदल नसून चिखलीच्या स्थानिक राजकारणात त्यातून कोणती नवी समीकरणे आकाराला येतात, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. बोंद्रे यांच्यासोबत कोणते कार्यकर्ते आणि पदाधिकारी भाजपमध्ये येतात, त्यांची पक्षातील भूमिका काय राहते आणि आगामी काळात स्थानिक पातळीवर भाजपचे राजकारण कोणत्या दिशेने जाते, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

एकीकडे बोंद्रे यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला असताना दुसरीकडे श्वेता महाले यांनी त्यांच्या निर्णयाचे केलेले स्वागत या संपूर्ण घडामोडीला आणखी राजकीय महत्त्व प्राप्त करून देत आहे. त्यामुळे २२ सप्टेंबरचा मुंबईतील पक्षप्रवेश सोहळा चिखलीच्या राजकारणासाठी नेमका कोणता नवा अध्याय उघडतो, याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129