
सरकारी शाळांमधील शिक्षकांच्या बदल्या होणार बंद, येत्या दोन दिवसांत निघणार आदेश
MH 28 News Live : सरकारी शाळांच्या शिक्षकांच्या दर तीन वर्षांनी बदल्या होत असतात. या बदल्यांवरून दरवर्षी मोठा वाद निर्माण होतो. पण बदल्यांचा खेळ आता बंद होणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

शिक्षकांच्या बदल्यांमध्ये होणारा आर्थिक व्यवहार मोडीत काढण्यासाठी आणि शिक्षणाचा दर्जा राखण्यासाठी दर तीन वर्षांनी होणाऱ्या शिक्षकांच्या बदल्या यापुढे होणार नाहीत. मात्र, शिक्षकांच्या विनंतीनुसार अथवा त्यांच्या तक्रारी आल्यास तत्काळ बदली केली जाईल, असेही केसरकर यांनी सांगितले. शिक्षकांच्या योगदानामुळे शाळांची महती वाढते. शिक्षकांची बदली झाल्यास अनेक पालक मुलांना दुसऱ्या शाळेत प्रवेश घेतात, असेही त्यांनी नमूद केले. शिक्षक भरतीसाठी यापूर्वी परीक्षा घेतलेल्या उमेदवारांच्या लवकरच नेमणुका केल्या जातील. त्याची तयारी पूर्ण झाली असून संच मान्यतेनंतर नेमणुका देण्यात येतील, असेही केसरकर यांनी स्पष्ट केले.



