
लोणार तालुक्यात लम्पीला रोकण्यात यश
MH 28 News Live, लोणार : सर्वत्र लम्पी या चर्मरोगाने जनावरावर मोठ्या प्रमाणात शिरकाव केला असला तरी लोणार तालुक्यात मात्र या रोगास लसीव्दारे रोकण्यात पशुवैद्यकीय विभागाला यश आले आहे. आतापर्यंत लम्पी या रोगामुळे तालुक्यात एकही जनावर दगावल्याची नोंद झाली नाही हे विशेष.
तालुक्यात लम्पी या चर्मरोगाची जनावरामध्ये लागण होत असल्याची चाहुल लागताच तालुका पशुवैद्यकीय विभागाने लम्पी आजाराच्या लसिकरणाला सुरवात केली. शासकिय कर्मचारी संख्याबळ कमी असल्याने खाजगी १६ डॉक्टरची मदत घेऊन दररोज सहा गावे लसीकरण करण्यासाठी नियोजित करुन लसिकरणाला सुरवात केली उपलब्ध ५ हजार रसाचे शंभर टक्के लसीकरण करुन परत ९ हजार लस उपलब्ध करून घेऊन लसिकरणाला गतिमान केले. यामुळे लम्पी या जनावरांच्या चर्मरोगावर नियंत्रण करणे शक्य झाल्याने तालुक्यात जनावरांचा मृत्यू दर शुन्य राहिला. तालुक्यात २१ जनावरांना लम्पीची लागण झाली होती, त्यापैकी ११ जनावरावर यशस्वीरित्या उपचार करून बरे करण्यात आले तर १० जनावरावर उपचार सुरू आहेत. उपलब्ध ९ हजार लसीचे लसीकरण करुन लम्पी या आजाराला रोखण्यात येईल अशी माहिती तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ रवी मुसळे यांनी दिली. या युद्ध पातळीवरील लसीकरणामुळे लोणार तालुक्यातील पशु मालकांची चिंता मिटली असल्याचे चित्र सध्या तालुक्यात दिसत असून यामुळे पशु मालक बळीराजा आनंदी दिसत आहे.