
” रावाचा झाला रंक…” धरमपाल गुलाटी यांच्या निधनानंतर वर्षभरातच ‘ MDH मसाले ‘ वर आली कंपनी विकण्याची वेळ
MH 28 News Live : मसाल्यांचा राजावर काय वेळ आली ? अवघ्या वर्षभरात MDH विक्रीच्या उंबरठ्यावर आली आहे. ही कंपनी विकत घेण्यासाठी हिंदुस्थान युनिलिव्हर ही बहुराष्ट्रीय कंपनी उत्सुक असल्याचे वृत्त आहे.
एफएमसीजी प्रॉडक्ट्समधील मोठी कंपनी हिंदुस्तान युनिलिव्हरचे नाव एमडीएच ताब्यात घेऊ इच्छिणाऱ्यांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आले आहे. यामुळे एमडीएचचे शेअर्सदेखील ४ टक्क्यांनी गडगडले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार हिंदुस्तान युनिलिव्हर आणि महाशियान दी हट्टी म्हणजेच एमडीएच यांच्यात बोलणी सुरु आहेत. यामध्ये एचयुएल एमडीएचमध्ये मोठा हिस्सा खरेदी करण्याची शक्यता आहे. तसा प्रस्ताव ठेवण्यात आला असून एमडीएचची किंमत १० ते १५ हजार कोटी रुपये असण्याची शक्यता आहे. मिंटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
भारतात ब्रँडेड मसाल्यांची बाजारपेठ मोठी आहे आणि २०२५ पर्यंत ती दुप्पट होऊन ५० हजार कोटींपर्यंत जाईल असा अंदाज आहे. प्रत्येक राज्यात स्वयंपाक करण्याच्या सवयी आणि ग्राहकांच्या पसंती बदलतात. यामुळे या बाजारावर प्रादेशिक ब्रँडचेच वर्चस्व असते. तरीदेखील एमडीएचने देशभरात त्या त्या भागातील मसाल्यांची व्हरायटी बनवून आपले अधिराज्य प्रस्थापित केले होते. राष्ट्रीय स्तरावरील बड्या कंपन्यांसाठी भारतातील मसाल्याचा बाजार नेहमीच कठीण राहिला आहे.
या बाजारात दणक्यात उतरण्यासाठी एचयुएलला एमडीएचची मोठी मदत मिळणार आहे. राष्ट्रीय स्तरावरील मसाल्याच्या ब्रँडबद्दल बोलायचे तर, MDH ब्रँडची नेहमीच एक वेगळी ओळख बनलेली आहे. त्यांच्या टीव्ही जाहिरातींमुळे, MDH ने देशभरात मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळविली होती. टीव्ही जाहिरातींमध्ये महाशय धरमपाल गुलाटी त्यांच्या वेगळ्या अंदाजात दिसले. त्यांनीच या रोपट्याचा वटवृक्ष उभारला. परंतू ३ डिसेंबर २०२० मध्ये गुलाटी यांचे निधन झाले आणि आज अवघ्या वर्षभरातच त्याचा हा वटवृक्ष विकण्याच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला आहे.



