
हुश्श… अखेर जिल्हा कोरोना मुक्त….! बरोब्बर दोन वर्षांपूर्वी विदर्भातून बुलडाण्यात आढळला होता पहिला रुग्ण
MH 28 News Live, बुलडाणा : कोरोना या नावाने मागील दोन वर्षापासून कधी थरकाप..तर कधी भीती. तर कधी चिंता वाढविली. जिल्ह्यात विदर्भातील पहिला रुग्ण 29 मार्च 2020 रोजी आढळला.. तेव्हापासून सुरू झाला कोरोना मुक्तीचा प्रवास.. या मुक्तीने 10 मे 2020 रोजी काही तासांसाठी हजेरीही लावली. पण ती क्षण भंगुर ठरली. मग पहिल्या लाटेने जोर पकडला.. प्रशासन युद्ध पातळीवर काम करत होते. कोरोना संसर्ग नियत्रणात ठेवण्यासाठी शासनाचे सर्व विभाग आपली भूमिका बजावत होते. प्रशासनाच्या या पॉझीटीव्हीटी पुढे पहिली लाट निगेटिव्ह झाली. लावलेले निर्बंध शासनाने शिथिल केले. जन जीवन सुरळीत होत असतानाच दुसऱ्या लाटेच्या बातम्या.. पूर्व अंदाज धडकत होते. अखेर मार्च 2021 मध्ये दुसरी लाट आलीच. मागील लाटेपेक्षा दुसरी लाट थैमान घेवून आली. प्राणवायू कमी पडला.. रूग्ण दगावत होते. अशा परिस्थितीत प्रशासनाने जिल्ह्यात लिक्वीड ऑक्सीजन प्लांट लावले. बाहेरून प्राणवायू मागवून जिल्ह्याची गरज भागविली. तर प्राणवायू निर्मितीचे प्लांट ही उभारण्याचे प्रयत्न सुरू झाले. दुसऱ्या लाटेत अनेक स्त्रिया विधवा झाल्या.. लहानगी पोरकी झाली.. काही अनाथ झाली.. कुणाचा भाऊ गेला.. बहीण गेली.. पत्नी गेली. अगदी कुटुंबाची वाताहत झाली.
दुसरी लाट थांबण्याचे नाव घेत नव्हती . मग सुखद बातमी आली. कोरोनाची लस आली. प्रयोग यशस्वी झाले.लसिकरणाची जय्यत तयारी प्रशासनाने केली. ड्राय रण घेण्यात आला. पहिले हेल्थ वर्कर, पहिल्या फळीतील वर्कर.. 60 वर्षांवरील वृद्ध व्यक्ती.. दुर्धर आजाराने ग्रस्त नागरिक यांचे लसीकरण सुरू झाले.. त्यानंतर 18 वर्षापासून मग 15 वर्ष आणि आता 12 वर्षापासून लसीकरण सुरू आहे. अफवांचे पेव फुटले.. मात्र या सर्व अडथळ्यांवर मात करीत लसीकरण वेगाने सुरू ठेवण्यात आले. पहिला डोस.. दुसरा डोस देण्यात आला. लसीकरण झाले असल्यामुळे तिसरी लाट आली पण कमजोर पडली. कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी शासन, प्रशासनाने केलेले विविध प्रयत्न..नागरिकांचे मिळालेले सहकार्य.. नियमांचे केलेले पालन.. यामुळे आज आपण कोरोनामुक्ती पर्यंत आलो आहे. कोरोना विषयी माहिती जिल्हा माहिती कार्यालय मार्फत कोरोना अलर्ट मधून आपण सातत्याने देत आहो.. भविष्यातही रूग्ण आढळल्यास हा अलर्ट मिळणारच आहे.
पॉझीटीव्ह रूग्णसंख्येने जिल्हा वासियांना आज 58 व्यांदा शून्याचा अनुभव दिला आहे. आनंदाची बाब म्हणजे आज जिल्ह्यात एकही सक्रिय रूग्ण नाही . भविष्यातही एकही रुग्ण निघू नये यासाठी जिल्हावासियांनी मास्क वापरणे, हात वारंवार स्वच्छ धुणे किंवा सॅनीटाईज करणे व सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करणे या त्रि सुत्रींचा अवलंब करावा. तसेच पात्र लाभार्थ्यांनी कोविड लसीकरण करून घ्यावे.
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड चाचणी द्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 301 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी आज एकही पॉझीटीव्ह रूग्ण आढळून आला नाही. सर्वच 301 अहवाल कोरोना निगेटिव्ह प्राप्त झाले आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 22 व रॅपिड चाचणीमधील 279 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 301 अहवाल निगेटीव्ह आहेत.
त्याचप्रमाणे आजपर्यंत 806560 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 98311 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 98311 आहे. आज रोजी 53 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 806560 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 99002 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 98311 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. तसेच आजपर्यंत 688 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.