
‘ द कश्मीर फाईल्स ‘ कार्यकर्त्यांना मोफत दाखवून माजी आमदार विजयराज शिंदे यांनी साजरा केला भाजपा स्थापना दिवस
MH 28 News Live, बुलडाणा : गेल्या काही दिवसांपासून देशात प्रचंड गाजत असलेला काश्मीरच्या पंडितांच्या हाल अपेष्टा आणि स्थलांतरावर आधारित ‘ द कश्मीर फाइल्स ‘ हा चित्रपट सर्वत्र प्रेक्षकांची तुफान गर्दी खेचत आहे. या चित्रपटावरून विविध राजकीय पक्षांमध्ये कलगीतुरा देखील रंगला आहे. मात्र प्रेक्षकांनी या चित्रपटाला निर्भेळ पसंती दिल्याचे मान्यच करावे लागेल. द कश्मीर फाइल्स मधील विषय हा संवेदनशील व राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असल्यामुळे हा चित्रपट देशातील जास्तीत जास्त नागरिकांनी पहावा यासाठी अनेक लोक प्रयत्न करत आहेत. यामध्ये बुलडाण्याचे माजी आमदार व भाजपाचे नेते विजयराव शिंदे यांनी देखील आपल्या सहभाग नोंदवला. भारतीय जनता पक्षाच्या ४२ व्या स्थापना दिवसाचे औचित्य साधून बुलडाणा शहरातील पक्ष कार्यकर्त्यांना शिंदे यांच्या मार्फत हा चित्रपट मोफत दाखवण्यात आला. स्थानिक एआरडी मॉल या चित्रपटगृहात भाजपा कार्यकर्त्यांसह जाऊन शिंदे यांनी हा चित्रपट बघितला.
भारतीय जनता पक्षाचा ४२ वा स्थापना दिवस आज देशभर सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त ठिकठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे व उपक्रमांचे आयोजन पक्षातर्फे करण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर बुलडाणा शहरात माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या वतीने पक्ष कार्यकर्त्यांना ‘ द काश्मीर फाईल्स ‘ हा चित्रपट मोफत दाखवण्यात आला. शिंदे यांच्या ‘ शिवालय ‘ जनसंपर्क कार्यालयापासून भव्य रॅली काढण्यात आली शहरातील मुख्य मार्गावरून गेलेल्या या रॅलीचा समारोप पुन्हा शिवालयात झाला. त्यानंतर आपल्या शेकडो भाजपा कार्यकर्त्यांसह माजी आमदार विजयराज शिंदे यांनी एआरडी माँल या चित्रपटगृहांमध्ये जाऊन तेथे सर्वांचे तिकीट खरेदी केले व आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह हा चित्रपट पाहिला. यावेळी उत्साही कार्यकर्त्यांच्या गर्दीने व प्रचंड घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता. विजयराज शिंदे यांनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केलेल्या भाजपा स्थापना दिवसाची सर्वत्र चर्चा होत आहे.