
जिल्हा परिषदेने केली आपल्या कर्मचाऱ्यांची मानसिक आरोग्य तपासणी
MH 28 News Live, बुलडाणा : जिल्हा परिषदेच्या प्रांगणात जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांसाठी बुधवारी, दि. 26 एप्रिल 2023 रोजी मानसिक आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. शिवाजी सभागृहामध्ये झालेल्या कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एम. एम. राठोड, मानसोपचार तज्ज्ञ डॉ. विश्वास खर्चे, डॉ. महेश बाहेकर, सायकोलॉजिस्ट सिद्धार्थ जाधव, मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता हरिदास अंभोरे उपस्थित होते.

यावेळी मानसिक आजाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यात जीवनातील मानसिक ताण खूप वाढले आहे. मानवी जीवन अत्यंत तणाव आणि चिंताग्रस्त झाले आहे. आपल्याला अनेक समस्यांना बऱ्यावाईट गोष्टींना सामोरे जावे लागते. अशा गोष्टी वारंवार घडल्यास मनावर खूप दडपण येते, चिंता व बैचेनी वाढू लागते. यामधूनच अनेक प्रकारच्या मानसिक रोगामध्ये प्रचंड वाढ होत आहे. शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्य जपणेही खूप गरजेचे आहे. झोप न येणे, मनात उदास वाटणे, कामात मन न लागणे, भूक न लागणे,आत्मविश्वास कमी होणे, चिडचिड होणे, डोके भारी वाटणे, आत्महत्येचे विचार मनात येतात. याप्रकारचे मानसिक आजारी हे आपल्या शेजारी आढळल्यास त्यांना उपचार आणि मार्गदर्शन करु शकतो, अशी माहिती देण्यात आली.
मानसिक आजारी नागरिकांसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयांतर्गत विविध उपक्रम चालविण्यात येतात. याबाबत अधिक माहितीकरीता जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयात असलेल्या बाह्यरुग्ण खोली क्र. 12 मध्ये संपर्क साधावा. याठिकाणी सकाळी 8.30 ते 1 किंवा मानसिक आरोग्य विनामुल्य समुपदेशन हेल्पलाईन नंबर 14416 वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी मनोविकृती परिचारीका पुजा मधुकर वानखेडे, केस रजिस्टर चंद्रकांत जामहोड उपस्थित होते.



