
खामगाव जालना रेल्वे मार्गासाठी उद्यापासून चिखली तहसील कार्यालयासमोर सुरू होणार सत्याग्रह व साखळी उपोषण
चिखली : खामगाव जालना रेल्वे मार्गाला राज्य शासनाने आपला ५० टक्के राज्य हिस्सा मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करून तसा ठराव केंद्रीय रेल्वे बोर्डाकडे त्वरित पाठवावा या प्रमुख मागणीसाठी रेल्वे लोक आंदोलन समितीतर्फे दि. १२ जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ माॅ साहेब व स्वामी विवेकानंद जयंती पासून चिखली तहसील कार्यालय समोर सत्याग्रह आंदोलन व साखळी उपोषणाला सुरुवात होत आहे. या आंदोलनाचे निवेदन आज चिखलीच्या तहसीलदारांना तहसीलदार सुरेश कव्हळे यांना सादर करण्यात आले. योगायोगाने आज चिखली शहरांमध्ये महायुतीच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक आयोजित केली होती या बैठकीसाठी आलेल्या महायुतीच्या नेत्यांना देखील या निवेदनाच्या प्रती देण्यात आल्या.
भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस रिपब्लिकन पार्टी रयत क्रांती संघटना आधी महायुतीच्या घटक पक्षांची समन्वय समितीची बैठक श्रीराम नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये आयोजित करण्यात आली होती या बैठकीसाठी उपस्थित झालेले खा. प्रतापराव जाधव, माजी मंत्री आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे, माजी मंत्री आ. डॉ. संजय कुटे, आ. श्वेताताई महाले, आ. आकाश फुंडकर, आ. डॉ. संजय रायमुलकर आदी लोकप्रतिनिधींना देखील हे या निवेदनाच्या प्रती देण्यात आल्या. राज्यात सत्ताधारी असलेल्या महायुतीच्या सर्व नेत्यांनी व आमदार खासदारांनी जिल्ह्यातील या महत्त्वाच्या प्रश्नासाठी एकत्रित येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून या मार्गासाठी ५० टक्के राज्य हिस्सा लवकरात लवकर मंजूर करून तसे पत्र केंद्रीय रेल्वे बोर्डाला पाठवण्यासाठी आग्रह धरावा अशी मागणी रेल्वे लोकआंदोलन समितीतर्फे करण्यात आली. या निवेदनावर रेल्वे लोकआंदोलन समितीचे डॉ. किशोर वळसे, रेणुकादास मुळे, संतोष लोखंडे, अनुप महाजन, भारत दानवे, कैलास शर्मा, सतीश शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शंतनू बोंद्रे, गोपाल खंडेलवाल, असलम हिरीवाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रवींद्र तोडकर, समाधान झगडे, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत भटकर, हरिभाऊ परिहार, पत्रकार इफ्तेखार खान, गोपाल तुपकर, असलम हिरीवाले, देवानंद कुळसुंदर, शेख मुजम्मिल रब्बानी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.