
शेतकरी विरोधी धोरण अवलंबणाऱ्या पिक विमा कंपनीला वठणीवर आणणार – आ. श्वेताताई महाले खरीप पिक पूर्व आढावा सभेत घेतला शासकीय तयारीचा मागोवा
MH 28 News Live, चिखली : नैसर्गिक संकटाचा बळी ठरणाऱ्या शेतकऱ्याचे वादळी वारे, गारपीट, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी यामुळे अतोनात नुकसान होते. मात्र, नियमाच्या कचाट्यात पकडून या ना त्या कारणाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई विमा देण्याची टाळाटाळ पीक विमा कंपनीकडून होत असल्याची उदाहरणे चिखली तालुक्यात मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत, या प्रकरणाची आपण चौकशी करणार असून दोषी ठरणाऱ्या एआयसी पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांंविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल असे प्रतिपादन आ. श्वेताताई महाले यांनी केले. याशिवाय पीक कर्ज प्रकरणात राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांबाबत मवाळ भूमिका घ्यावी, कागदपत्रांची पूर्तता सौजन्याने करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करावे असे निर्देश देखील आ. श्वेताताई महाले यांनी दिले. तालुकास्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा सभेच्या अध्यक्ष स्थानावरून मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.
शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला खरीप हंगाम सुरू होत असून पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत व्हावी, त्यांना कुठल्याही गोष्टीची अडचण भासू नये व पेरणी व्यवस्थित पार पडावी यासाठी तालुकास्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीचे आयोजन कृषी विभागातर्फे दि. १३ जून रोजी तहसील कार्यालयाच्या सभागृहात करण्यात आले होते. आ. श्वेताताई महाले या सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. कृषी विभाग, महसूल विभाग राष्ट्रीयकृत बँकांचे प्रतिनिधी, पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती, सहकार विभाग आदी विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी तसेच कृषी सेवा केंद्रांचे संचालक या बैठकीस उपस्थित होते. आ. श्वेताताई महाले यांनी खरीप हंगामाच्या पूर्वी शेतकऱ्यांसाठी शासकीय विभागांकडून केली जाणारी मदत, कर्ज पुरवठा, पिक विमा, बी – बियाणे पुरवठा आदी गोष्टींचा मागोवा या सभेतून घेतला. शेतकऱ्यांचा संबंध येणाऱ्या प्रत्येक शासकीय विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य करावे अशा मार्गदर्शक सूचना देखील आ. श्वेताताई महाले यांनी या सभेत केल्या.
पिक विमा कंपनीच्या कारभाराची चौकशी करण्याचे दिले निर्देश
बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिक विम्याचे काम एआयसी या कंपनीकडे राज्य शासनाने सोपवले आहे. परंतु, चिखली तालुक्यात या कंपनीच्या कामकाजाबद्दल शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोष आहे. राज्य शासनाकडून केवळ एक रुपया प्रीमियम भरून शेतकऱ्यांना पिक विमा दिला जातो. परंतु, असे असतानाही चिखली तालुक्यात मात्र २४ हजार शेतकरी या पीक विम्याच्या योजनेपासून वंचित राहिले याकडे आ. श्वेताताई महाले यांनी एआयसी कंपनीच्या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. ही अक्षम्य चूक केवळ पिक विमा कंपनीच्या शेतकऱ्यांबाबतच्या उदासीनतेमुळे झाल्याचे त्या म्हणाल्या. अनेक भागात अवकाळी पाऊस, गारपीट, वादळी वारे, अतिवृष्टी यामुळे पिकांचे अतोनात नुकसान होऊन शेतकरी संकटात सापडला असतांनाही तांत्रिक कारणे व नियमाच्या कचाट्यात पकडून त्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्याची टाळाटाळ एआयसी पीक विमा कंपनी करत असल्याचे त्या म्हणाल्या. असे शेतकरी विरोधी धोरण अवलंबणाऱ्या पिक विमा कंपनीच्या विरोधात वेळ पडल्यास रस्त्यावर देखील आपण उतरू असा इशारा आ. श्वेताताई महाले यांनी या सभेत दिला. शेतकऱ्यांची हक्काची पिक विम्याची रक्कम नाकारणाऱ्या एआयसी पिक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांची चौकशी एका समितीद्वारे करावी असे निर्देश या सभेत आ. महाले यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना दिले असून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची भूमिका आपण स्वतः घेणार असल्याचे आ. महाले म्हणाल्या.
पीक कर्ज वाटप शेतकऱ्यांना प्राधान्य देऊन करा – आ. महाले
या सभेमध्ये उपस्थित असलेल्या चिखली तालुक्यातील राष्ट्रीयकृत बँकांच्या प्रतिनिधींना मार्गदर्शन करताना तालुक्यातील कोणत्याही शेतकऱ्याची पिक कर्जासंदर्भात तक्रार यायला नको अशी अपेक्षा आ. श्वेताताई महाले यांनी व्यक्त केली. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे तसेच शासनाकडून देण्यात आलेले उद्दिष्ट प्रत्येक बँकेच्या शाखेने पूर्ण करावे, प्रलंबित असलेल्या कागदपत्रांची शेतकऱ्यांकडून पूर्तता करून घ्यावयाची असल्यास त्या शेतकऱ्याशी सौजन्याने वागून ती करून घ्यावी व प्राधान्याने आणि प्रभावीपणे पीक कर्जाचे वाटप खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी करावे असे आवाहन आ. श्वेताताई महाले यांनी बँकांच्या प्रतिनिधींना केले.
पीएम एफएमई योजना अधिक प्रभावीपणे राबवा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० मे २०२२ रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना सुरू करण्याची घोषणा केली. ही योजना लघु आणि सूक्ष्म खाद्य व्यवसाय करणाऱ्या उद्योजकांच्या हितासाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत, आर्थिक सहाय्य अनुदानाच्या स्वरूपात आणि लघु आणि सूक्ष्म खाद्य व्यवसायांना वाढीसाठी आणि स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी सरकारकडून आर्थिक मदत दिली जाते. याशिवाय विनामूल्य प्रशिक्षण, प्रशासकीय मदत, MIS योजनेची प्रसिद्धी यांसारख्या सुविधाही लोकांना मोफत दिल्या जातात, ज्यामुळे खास करून शेतकरी वर्गासाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतात. चिखली तालुक्यात या योजनेची अधिक प्रभावीपणे व्हावी या माध्यमातून महिला व युवक शेतकरी प्रगतिशील, कास्तकार यांना शेती प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे तसेच चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांनी राष्ट्रीयकृत बँकांकडे या योजनेसाठी सादर केलेले प्रस्ताव तातडीने मंजूर करून
त्यांना अर्थसहाय्य उपलब्ध करावे असे निर्देश आ. श्वेताताई महाले यांनी यावेळी दिले. सदर योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात काही अडचणी असल्यास त्या आपण प्राधान्याने सोडवू अशी ग्वाही देखील आ. महाले यांनी यावेळी बोलताना दिली.
इ के वाय सी चे पोर्टल पूर्ववत सुरू करण्याची आ. श्वेताताई महाले यांची सूचना
काही तांत्रिक बिघाडामुळे इ केवायसी पोर्टल सद्यस्थितीत बंद आहे. त्यामुळे तालुक्यातील ६००० पेक्षाही जास्त शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसान भरपाईचा लाभ अद्याप पर्यंत मिळाला नाही. या गोष्टीची गांभीर्याने दखल घेत सदर पोर्टल त्वरित पूर्ववत सुरू करण्यात यावे व शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम त्वरित मिळण्यासाठी सहकार्य करावे अशी महत्त्वाची सूचना आ. श्वेताताई महाले यांनी या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना केली.
या सभेत तालुक्यातील निवडक शेतकऱ्यांना मूग व उडीद बियाण्याचे शासनाकडून मोफत वाटप करण्यात आले. आ. श्वेताताई महाले यांच्या हस्ते या बियाण्यांचे वितरण झाले. याशिवाय कृषी महाजन कृषी केंद्राचे कृषी सेवा केंद्राचे संचालक महेश महाजन यांनी सायकलिंगच्या स्पर्धेमध्ये आफ्रिका देशात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांचा सत्कार आ. महाले यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे, प्रभारी तहसीलदार वैभव खाडे, सहाय्यक निबंधक सहकार राजेंद्र घोंगे, तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर सवडतकर, नाबार्डचे अधिकारी रोहित गाडे, ए एस एस इ पिक विमा कंपनीचे अधिकारी मयूर लोणकर, यांच्यासह भाजपा शहराध्यक्ष पंडितराव देशमुख, तालुकाध्यक्ष सुनील पोफळे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष संतोष काळे, अनमोल ढोरे, युवराज भुसारी या बैठकीस उपस्थित होते.