
सावधान…! कोरोना पुन्हा डोके वर काढतोय; तज्ज्ञांचं मत काय आहे ? वाचा ही बातमी…
MH 28 News Live : चार वर्षांपूर्वी संपूर्ण जगभरात कोरोनाने थैमान घातले होते. या महामारीमुळे जगभरात लॉकडाऊन लावावा लागला होता. त्या काळात अनेकांनी आपले प्रियजन गमावले. आजही त्या दिवसांच्या कटू आठवणी मनात ताज्या आहेत.
सन २०२० मध्ये आलेली कोरोनाची लाट सन २०२२ मध्ये नियंत्रणात आली. मात्र आता पुन्हा एक चिंताजनक बाब समोर आली आहे. काही देशांमध्ये कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. विशेषतः सिंगापूरमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे भारतातही काळजी वाढली आहे.
या पार्श्वभूमीवर प्रश्न उपस्थित होतो – भारतात पुन्हा कोरोनाची लाट येईल का ? जर आलीच, तर हा नवीन विषाणू किती घातक ठरू शकतो ? त्यामुळे किती हानी होऊ शकते ? रुग्णांना काय त्रास होऊ शकतो ? याबाबत आरोग्य तज्ज्ञ डॉ. अविनाश भोंडवे यांनी महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. चला, त्यांचे म्हणणे जाणून घेऊया.
डॉ. अविनाश भोंडवे यांनी नेमकं काय सांगितलं ?
सिंगापूरमध्ये कोरोनाचे नवीन रुग्ण सापडल्यामुळे भारतात चिंता व्यक्त होत आहे, मात्र याबाबत घाबरण्याचे कारण नसल्याचे डॉ. भोंडवे यांनी स्पष्ट केले आहे. सन २०२० मध्ये सुरू झालेली कोरोनाची लाट सन २०२२ मध्ये नियंत्रणात आली होती. त्यावेळीही कोरोनाचा विषाणू पूर्णतः नाहीसा झालेला नव्हता. त्यामुळे काही भागांमध्ये त्याचा पुनश्च उद्रेक होईल, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने आधीच दिला होता.
भारताच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, डॉ. भोंडवे सांगतात की काळजी करण्याची गरज नाही. हा विषाणू भारतात मोठ्या प्रमाणात पसरणार नाही. सध्या आढळणारे नवीन व्हेरियंट फारसे घातक नाहीत. गेल्या चार वर्षांमध्ये जरी अधिकृतपणे कोरोना संपल्याचे घोषित झाले असले, तरी अधूनमधून काही रुग्ण सापडतच होते. आपल्या देशात थोड्याफार प्रमाणात कोरोना पुन्हा दिसू शकतो, मात्र मोठ्या लाटेची शक्यता कमी आहे.
डॉ. भोंडवे पुढे सांगतात की, या विषाणूचा आढळ प्राण्यांमध्येही झालेला आहे. कोरोना नवा असो किंवा जुना, त्यावरील उपाय हेच राहणार आहेत. म्हणूनच घाबरण्याऐवजी सावध राहा, काळजी घ्या, असे त्यांनी आवाहन केले आहे.