
नगरपालिका रणधुमाळीची चाहूल; प्रभाग रचनेचे आदेश, इच्छुक लागले कामाला
MH 28 News Live / बुलढाणा : राज्यात येत्या तीन ते चार महिन्यांत नगरपालिका निवडणुकांचा धुराळा उडण्याची शक्यता आहे. नगरपालिकांमध्ये प्रभाग रचनेसंदर्भातील आदेश प्राप्त झाले असून दिवाळीनंतर प्रत्यक्ष मतदान होणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे विद्यमान नगरसेवक आणि इच्छुक उमेदवारांमध्ये अस्वस्थता वाढली असली तरी ते आतापासूनच आपल्या तयारीला लागले आहेत. “आपला प्रभाग राहणार की नव्या प्रभागात उमेदवारी करावी लागेल ?” याचे टेन्शन सुध्दा काहींना निर्माण झाले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने सर्व नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिल्यानंतर निवडणूक आयोगाने तयारीला सुरुवात केली आहे. त्यानुसार, बुलढाणा जिल्ह्यातील ११ नगरपालिकांना १० जून रोजी नवीन प्रभाग रचनेबाबतचे आदेश मिळाले आहेत. या आदेशानुसार, बहुतेक प्रभागांमध्ये दोन सदस्य असतील, तर फक्त एका प्रभागात तीन सदस्य असतील, अशी माहिती मिळाली आहे.
स्थानिक नेत्यांमध्ये धाकधूक
नगरपालिकेतील प्रभाग रचनेसंदर्भातील आदेश प्राप्त झाले आहेत. त्यामुळे आता “जुनी रचना कायम राहणार की नव्याने बदल होणार ?” यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. तरीही, २०२२ मध्ये निश्चित झालेली प्रभागरचना हीच निवडणुकीसाठी अंतिम असेल, असे संकेत आहेत. परंतु, यामध्ये काही बदल झाला तर आपले राजकीय भवितव्य कसे आणि काय असेल याबद्दल प्रस्थापित स्थानिक नेत्यांमध्ये धाकधूक सुरू झाली आहे.
प्रशासकीय राजवटीतून निवडणुकांकडे वाटचाल
जिल्ह्यातील ११ पैकी ९ नगरपालिकांची मुदत डिसेंबर २०२१ मध्येच संपली होती. त्यानंतर येथे प्रशासकीय राजवट लागू आहे. त्यामुळे लवकरात लवकर निवडणुका जाहीर व्हाव्यात, ही सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि आजी-माजी नगरसेवकांची मागणी आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर निवडणुका जाहीर होण्याची शक्यता बळावली आहे. त्यातच आता प्रभाग रचनेचे आदेश आल्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.