♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

अमृत संस्थेच्या योजनांचे लाभ खुल्या प्रवर्गातील जास्तीतजास्त लाभार्थ्यांनी घ्यावे – आ. श्वेताताई महाले समर्थ बहुउद्देशीय प्रतिष्ठानतर्फे कार्यशाळेचे आयोजन

MH 28 News Live / चिखली : राज्यातील महायुतीचे सरकार हे समाजातील प्रत्येक घटकाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी कटिबद्ध आहे. याच भूमिकेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमृत या स्वायत्त संस्थेची स्थापना खुल्या प्रवर्गातील जातींच्या विकासासाठी केली असून विद्यार्थी, महिला, सुशिक्षित बेरोजगार, उद्योजक, व्यावसायिक अशा वेगवेगळ्या वर्गांसाठी अमृत संस्थेतर्फे विविध कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा लाभ खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्यांनी जास्तीतजास्त प्रमाणात घ्यावा; त्यासाठी आवश्यक असलेली सर्व मदत आणि सहकार्य करण्यास आपण तत्पर असल्याचे प्रतिपादन आ. श्वेताताई महाले यांनी केले. समर्थ बहुउद्देशीय प्रतिष्ठानच्या वतीने दि. २२ जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या अमृत कार्यशाळेचे उद्घाटन करताना त्या बोलत होत्या. चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रकाश महाराज जवंजाळ, जिल्हा उपाध्यक्ष सुरेंद्रप्रसाद पांडे, माजी नगराध्यक्ष सुहास शेटे, भाजपा शहराध्यक्ष सागर पुरोहित, युवा मोर्चा शहराध्यक्ष विजय वाळेकर व श्रीरंग पितळे यांची मंचावर उपस्थित होती. अमृतचे जिल्हा व्यवस्थापक जिग्नेश कमानी यांनी या कार्यशाळेत संस्थेच्या योजनांची सविस्तर माहिती दिली.

समर्थ बहुउद्देशीय प्रतिष्ठानतर्फे अमृत संस्थेच्या योजनांची माहिती देणारी कार्यशाळा स्थानिक संत सावता माळी भवनमध्ये आयोजित करण्यात आली होती. ब्राह्मण, मारवाडी, गुजराती, सिंधी, कायस्थ, ठाकूर, राजपूत, वैश्य इत्यादी जातींमधील लाभार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या या कार्यशाळेला शहरातील लाभार्थ्यांकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. अमृतचे जिल्हा व्यवस्थापक जिग्नेश कमानी यांनी संस्थेच्या शैक्षणिक व उद्योग व्यवसाय विषयक योजनांची सविस्तर माहिती दिली. उच्च शिक्षण, संगणक प्रशिक्षण तसेच एमपीएससी व यूपीएससी परीक्षांसाठी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थी – विद्यार्थिनींना फी माफी सवलत तसेच उद्योजक व व्यावसायिकांसाठी व्याज परतावा कर्ज योजना शिवाय उद्योग व्यवसायांचे प्रशिक्षण, महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळवण्यासाठी विशेष योजना आदींबद्दल कमानी यांनी माहिती दिली.

मुख्यमंत्री फडणवीस हे सर्व समावेशक नेतृत्व – आ. महाले

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्व समावेशक नेतृत्व आहे. राज्यातील प्रत्येक लहान – मोठ्या जाती-धर्मातील नागरिकांना विकासाची समान संधी मिळावी यासाठी त्यांची असणारी तळमळ वाखाणण्याजोगी आहे. याच जाणिवेतून खुल्या प्रवर्गामधील आर्थिक दुर्बल घटकांच्या विकासासाठी फडणवीस यांनी अमृत संस्थेची स्थापना केली व या संस्थेमार्फत खुल्या प्रवर्गातील समाजाला विकासाचा मार्ग आणखी प्रशस्त करून दिला अशा शब्दात आ. श्वेताताई महाले यांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्याची प्रशंसा केली. समर्थ बहुउद्देशीय प्रतिष्ठानतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अमृत कार्यशाळा हा एक उपयुक्त सामाजिक उपक्रम आयोजित केल्याबद्दल त्यांनी समर्थ बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे देखील कौतुक केले.

पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्य
देण्यासाठी चिखली अर्बन बँक तत्पर – सतीश गुप्त

दि चिखली अर्बन को-ऑपरेटिव बँक ही राज्य शासनाच्या प्रत्येक विधायक कार्यामध्ये नेहमीच हिरिरीने सहभागी होत असते. अमृत योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुद्धा आमच्या बँकेचा सहभाग पूर्वीपासूनच राहिला असल्याची माहिती कार्यशाळेच्या अध्यक्ष स्थानावरून भाषण करताना चिखली अर्बन को. ऑप बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त यांनी दिली. बँकेच्या माध्यमातून अमृत योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना जास्तीत जास्त अर्थसहाय्य करण्याची ग्वाही याप्रसंगी सतीश गुप्त यांनी दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक समर्थ बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष रेणुकादास मुळे यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन भिकू लोळगे यांनी केले. कार्यशाळेच्या आयोजनासाठी सतीश बिडकर, सखाराम राऊत, संजय शेळके, प्रणव सेवलकर, सौ. कविता मुळे, सौ. गीता कुटे यांनी सहकार्य केले

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129