
गॅस सिलिंडर स्फोटात ८५ वर्षीय वृद्धेचा दुर्दैवी मृत्यू: मलकापुरातील भीषण घटना
MH 28 News Live / मलकापूर : शहरातील अशोक नगर परिसर सोमवारी दुपारी भीषण आगीच्या घटनेने हादरून गेला. एका राहत्या घराला अचानक लागलेल्या आगीत गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन ८५ वर्षीय वृद्ध महिला जिवंत जळाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली. नर्मदाबाई लासुरकर असे मृत महिलेचे नाव असून, त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अशोक नगर येथील रोकडे यांच्या वाड्यात नर्मदाबाई लासुरकर या राहत होत्या. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या वृद्ध भावाचे निधन झाल्याने त्या घरात एकट्याच वास्तव्यास होत्या. सोमवारी, १२ मे रोजी दुपारी सुमारे दोन वाजताच्या सुमारास अचानक त्यांच्या घरातून धुराचे लोट बाहेर येऊ लागले. त्या वेळी शहरात प्रचंड उष्म्याची लाट असून तापमान तब्बल ४४ अंशांवर पोहोचले होते.

उन्हाची तीव्रता आणि वाहणाऱ्या वाऱ्यामुळे आगीने काही क्षणांतच विक्राळ रूप धारण केले. आग थेट स्वयंपाकघरापर्यंत पोहोचल्याने तेथील गॅस सिलिंडरचा जोरदार स्फोट झाला. स्फोटाचा आवाज परिसरात घुमल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, आगीचा वेग इतका प्रचंड होता की नर्मदाबाईंना घराबाहेर पडण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. त्या आगीत गंभीररीत्या होरपळल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी धाव घेत मदतकार्य सुरू केले. दरम्यान, अग्निशमन विभाग आणि पोलिस प्रशासनाने घटनास्थळी पोहोचून आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न केले. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण अशोक नगर परिसर शोकमग्न झाला असून, एकटेपणात जीवन जगणाऱ्या वृद्धांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.



