♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

“थंडगार बुलढाणा” ते “तापलेलं शहर”… ६८ वर्षांनंतर तापमानाचा ऐतिहासिक विक्रम

MH 28 News Live / बुलढाणा : बदलत्या हवामानाच्या झळा आता स्पष्टपणे जाणवू लागल्या असून, एकेकाळी थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बुलढाण्याने उष्णतेचा कडेलोट अनुभवला आहे. तब्बल ४३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद होत शहराने ६८ वर्षांनंतरचा विक्रम मोडला, आणि ‘कूल’ ओळख असलेल्या या शहराची प्रतिमा आता झपाट्याने बदलत असल्याचे चित्र समोर आले आहे.

इतिहासावर नजर टाकली तर, १९५४ आणि १९५८ साली अनुक्रमे ४२.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. मात्र यावर्षी तापमानाने तो टप्पा ओलांडत थेट ४३ अंशांवर झेप घेतली आहे. ही वाढ केवळ आकड्यांपुरती मर्यादित नसून, हवामानातील गंभीर बदलांची नांदी मानली जात आहे. इंग्रजांच्या काळात ‘हिल स्टेशन’ म्हणून प्रसिद्ध असलेले बुलढाणा, त्याच्या आल्हाददायक वातावरणामुळेच जिल्ह्याचे मुख्यालय बनले होते. उन्हाळ्यात साधारण ३५ ते ४० अंशांदरम्यान राहणारे तापमान आता त्या मर्यादेलाही मागे टाकत आहे. परिणामी, शहराची पारंपरिक ओळख धुसर होत चालल्याची खंत स्थानिकांमध्ये व्यक्त होत आहे.

सतत वाढणाऱ्या उष्णतेच्या लाटा, बदललेली हवामान पद्धती आणि पर्यावरणीय असंतुलन यामुळे बुलढाणा ‘थंड हवेचे ठिकाण’ ही ओळख कायम ठेवू शकेल का, असा गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहे. भविष्यातील हवामान अधिक तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने, या बदलांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज अधोरेखित होत आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129