
‘गण गणातून बोते’च्या जयघोषात गजानन महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान
MH 28 News Live / शेगाव : संत गजानन महाराज संस्थानच्या आषाढी वारीसाठी निघालेल्या पायदळ पालखी सोहळ्याचे रविवारी (२१ जून) सकाळी शेगाव येथून भक्तिमय वातावरणात प्रस्थान झाले. ‘गण गणातून बोते’च्या अखंड जयघोषाने संपूर्ण शेगाव नगरी दुमदुमून गेली. हजारो भाविकांच्या उपस्थितीत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पालखीने पंढरपूरच्या दिशेने वाटचाल सुरू केली.
पालखी सोहळ्यात यंदा सुमारे ७०० पताकाधारी, टाळकरी व वारकरी सहभागी झाले आहेत. प्रस्थानापूर्वी मंदिर परिसरात संस्थानच्या व्यवस्थापकीय विश्वस्तांच्या हस्ते श्री गजानन महाराजांच्या रजत मुखवट्याचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर पालखीचे प्रस्थान झाले. यंदाचा पालखी सोहळा हा ५७ वा वर्ष असून वारकरी परंपरेचे वैभव जपणारा हा सोहळा भक्तांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे.
या पालखीचा एकूण प्रवास ६० दिवसांचा आणि १,२०६ किलोमीटरचा असून तो बुलढाणा, अकोला, वाशिम, हिंगोली, परभणी, बीड, धाराशिव, सोलापूर आणि जालना या नऊ जिल्ह्यांतून होणार आहे. २१ जून ते १९ ऑगस्ट या कालावधीत हा धार्मिक प्रवास पार पडणार आहे.
पालखी श्रीक्षेत्र नागझरी (अकोला), पातूर, श्रीक्षेत्र डव्हा, शिरपूर जैन, रिसोड, सेनगाव, श्रीक्षेत्र नरसी नामदेव, श्रीक्षेत्र औंढा नागनाथ, श्रीक्षेत्र त्रिधारा, परभणी, गंगाखेड, परळी वैजनाथ, अंबाजोगाई, कळंब, धाराशिव, श्रीक्षेत्र तुळजापूर आणि श्रीक्षेत्र मंगळवेढा या मार्गाने पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. ३३ दिवसांत ७०१ किलोमीटरचे पदक्रमण पूर्ण करून पालखी २३ जुलै रोजी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे आषाढी वारीसाठी दाखल होईल.
पंढरपूर येथे २३ ते २८ जुलैदरम्यान सहा दिवस पालखीचा मुक्काम राहणार आहे. या कालावधीत वारकरी विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेऊन भक्तीमय वातावरणाचा अनुभव घेतील. त्यानंतर २९ जुलै रोजी पालखी शेगावकडे परतीच्या प्रवासाला सुरुवात करेल.
परतीच्या प्रवासात पालखी कुर्डूवाडी, भगवान बार्शी, भूम, कुंथलगिरी, बीड, गेवराई, जालना, न्हावा, सिंदखेडराजा, लोणार, मेहकर, जानेफळ आणि खामगाव या मार्गाने प्रवास करणार आहे. २७ दिवसांत ५०१ किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून १९ ऑगस्ट रोजी संत गजानन महाराजांची पालखी पुन्हा शेगावातील मंदिरात दाखल होणार आहे.
वारकरी संप्रदायाची परंपरा, भक्ती आणि समाजातील एकात्मतेचा संदेश देणारा हा पालखी सोहळा दरवर्षीप्रमाणे यंदाही भाविकांमध्ये विशेष उत्साह निर्माण करीत आहे.



