
चहाचा घोट पडला महागात; स्कार्पिओ फोडून साडेतीन लाखांची रोकड लंपास !
MH 28 News Live / लोणार : हॉटेलमध्ये अवघ्या काही मिनिटांसाठी चहा घेण्यासाठी थांबलेल्या कांदा बी व्यापाऱ्याला अज्ञात चोरट्यांनी चांगलाच दणका दिला. लॉक करून ठेवलेल्या स्कार्पिओची काच दगडाने फोडून चोरट्यांनी वाहनातील सुमारे साडेतीन लाख रुपयांची रोकड आणि महत्त्वाची कागदपत्रे असलेली बॅग लंपास केली. चोरीनंतर आरोपी दुचाकीवरून लोणी रोडच्या दिशेने पसार झाले. ही घटना २० ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे ११ वाजता लोणार शहरातील लोणी नाक्याजवळ घडली.
जालना येथील रहिवासी आणि सध्या केशव शिवणी येथे वास्तव्यास असलेले दिलीप माधवराव खरले हे कांदा बीचे व्यापारी आहेत. कांदा बी खरेदीसाठी ते पांगरा डोळे येथे आले होते. त्यानंतर शेगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील लोणी नाक्याजवळील एका हॉटेलमध्ये ते चहा घेण्यासाठी थांबले.
खरले यांनी त्यांची स्कार्पिओ क्रमांक एमएच २८ सीसी ५७५४ हॉटेल परिसरात लॉक करून ठेवली होती. हीच संधी साधत अज्ञात चोरट्यांनी वाहनाच्या चालकाच्या सीटमागील बाजूची काच दगडाने फोडली. त्यानंतर गाडीत ठेवलेली रोकड आणि महत्त्वाची कागदपत्रे असलेली बॅग बाहेर काढून घेतली. चोरी केल्यानंतर आरोपी साथीदारासह दुचाकीवरून घटनास्थळावरून पसार झाले.
सीसीटीव्ही फुटेज तपासणीला वेग
घटनेची माहिती मिळताच लोणार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश सदगीर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन कौळासे, पोलीस उपनिरीक्षक राजेश घोगरे, लेखनिक गणेश लोंढे, पोलीस कॉन्स्टेबल अनिल शिंदे, गजानन डोईफोडे आणि चालक हरिभाऊ ढाकणे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून, चोरट्यांच्या हालचालींचा माग काढण्यासाठी परिसरात नाकाबंदीही करण्यात आली. मात्र, तोपर्यंत आरोपी दुचाकीवरून लोणी रोडच्या दिशेने पसार झाले होते.
या घटनेमुळे लोणार शहरात खळबळ उडाली असून, व्यापाऱ्यांच्या वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणात रोकड ठेवण्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दिलीप खरले यांच्या फिर्यादीवरून लोणार पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ३४०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२), ३२४(२) नुसार अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रकाश सदगीर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोनाली गर्जे पुढील तपास करीत आहेत.



