
पत्रकार छोटू कांबळे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर
MH 28 News Live / चिखली : ‘दैनिक आम्ही चिखलीकर’चे मुख्य संपादक तथा युवा पत्रकार छोटू सुधाकर कांबळे यांची ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट पत्रकारिता राज्यस्तरीय पुरस्कार २०२६’साठी निवड झाली आहे. निर्भीड, लोकाभिमुख आणि सामाजिक बांधिलकीच्या पत्रकारितेतील योगदानाची दखल घेत त्यांना हा सन्मान जाहीर करण्यात आला.
साखरखेर्डा, ता. सिंदखेडराजा येथे दिवंगत वृक्षमित्र मधुकरराव खंडारे यांच्या तिसऱ्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. निवड समितीने छोटू कांबळे यांच्या पत्रकारितेतील कार्याचा विचार करून त्यांच्या नावाची निवड केली.
कांबळे यांनी सामान्य नागरिक, शेतकरी, कष्टकरी, वंचित व पीडित घटकांच्या प्रश्नांना सातत्याने व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित करणे, अन्यायाविरोधात आवाज उठविणे आणि लोकहिताचे प्रश्न निर्भीडपणे मांडणे, ही त्यांच्या पत्रकारितेची वैशिष्ट्ये आहेत.
‘दैनिक आम्ही चिखलीकर’च्या माध्यमातून चिखलीसह बुलढाणा जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय, कृषी, शैक्षणिक व प्रशासकीय प्रश्नांना त्यांनी सातत्याने वाचा फोडली आहे. त्यांच्या निवडीमुळे चिखलीच्या पत्रकारिता क्षेत्राचा राज्यस्तरावर गौरव झाला असून, युवा पत्रकारांसाठीही हा सन्मान प्रेरणादायी ठरला आहे.
मुख्य आयोजक सचिन खंडारे, निवड समितीचे अध्यक्ष विकास सुखधाने व उपाध्यक्ष समाधान सरकटे यांच्यासह मान्यवरांनी कांबळे यांचे अभिनंदन केले. त्यांच्या निवडीबद्दल पत्रकार, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर आणि शुभचिंतकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



