♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

क्षुल्लक वादातून काकाची निर्घृण हत्या; पुतण्याला जन्मठेप… कुंबेफळ येथे घडला होता थरार !

MH 28 News Live / बुलढाणा : क्षुल्लक वादातून स्वतःच्या सख्ख्या काकावर धारदार चाकूने सपासप वार करून त्यांची हत्या करणाऱ्या पुतण्याला बुलढाणा येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आरोपी समाधान पंडित जाधव याला जन्मठेपेसह १० हजार रुपये दंड ठोठावण्यात आला असून, दंडाच्या रकमेतून ८ हजार रुपये फिर्यादीस नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीचंद दौलतराम जगमलानी यांनी हा निकाल दिला.

ही घटना २९ ऑक्टोबर २०२२ रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजता बुलढाणा तालुक्यातील कुंबेफळ (गट क्रमांक २६) येथील शेतात घडली. फिर्यादी विलास शेषराव जाधव आणि त्यांचे वडील शेषराव रामा जाधव हे शेतात काम करत असताना अचानक शेषराव यांच्या ओरडण्याचा आवाज आला. विलास यांनी घटनास्थळी धाव घेतली असता दादाराव पंडित जाधव व आशा साईनाथ बडगुजर यांनी शेषराव यांना पकडून ठेवल्याचे, तर समाधान पंडित जाधव हा धारदार चाकूने त्यांच्या पोटावर, छातीवर आणि दोन्ही पायांवर वार करत असल्याचे दिसून आले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शेषराव जाधव यांचा रक्ताच्या थारोळ्यात पडून मृत्यू झाला.

घटनेनंतर समाधान जाधव स्वतः धाड पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे तपासात समोर आले. तसेच रक्ताने माखलेला शर्ट जाळण्यासाठी आरोपीने तो त्याची आई आनंदाबाई यांच्याकडे दिला होता. हा शर्ट शेतातील बांधावर जाळल्याचेही तपासात निष्पन्न झाले.

फिर्यादी विलास जाधव यांच्या तक्रारीवरून धाड पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम ३०२, २०१ व ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान आरोपींना अटक करून हत्येत वापरलेला चाकू जप्त करण्यात आला. जप्त केलेले कपडे व चाकू रासायनिक विश्लेषणासाठी अमरावती येथे पाठविण्यात आले. या अहवालात आरोपीच्या कपड्यांवर तसेच चाकूवर मृत शेषराव यांचे रक्त असल्याचे निष्पन्न झाले.

न्यायालयीन सुनावणीदरम्यान सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील वसंत लक्ष्मण भटकर यांनी प्रभावी युक्तिवाद केला. सरकार पक्षाने एकूण नऊ साक्षीदार तपासले. यामध्ये फिर्यादी, पंच, वैद्यकीय अधिकारी आणि तपास अधिकारी पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या.

भक्कम पुरावे आणि दोन्ही बाजूंचा युक्तिवाद लक्षात घेऊन न्यायालयाने समाधान पंडित जाधव याला भा.दं.वि. कलम ३०२ अंतर्गत दोषी ठरवत जन्मठेप व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दरम्यान, दादाराव जाधव, आशा बडगुजर आणि आनंदी जाधव यांना संशयाचा फायदा देत न्यायालयाने निर्दोष मुक्त केले.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129