
भटक्या विमुक्तांचा उत्कर्ष म्हणजेच आपला उत्कर्ष – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
MH 28 News Live / खामगाव : भारताने विश्वगुरू होण्यासाठी समाजातील प्रत्येक घटक समान भावनेने जोडला जाणे आवश्यक आहे. ही जबाबदारी केवळ सरकारची नसून समाजातील प्रत्येकाची आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.
बुलढाणा दौऱ्यावर असलेल्या डॉ. भागवत यांच्या हस्ते खामगाव येथील सर्वोदय पारधी समाज आश्रमशाळेच्या १० हजार चौरस फुटांच्या बंदिस्त सभागृह व क्रीडा संकुलाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आदिवासी मंत्री अशोक उईके, कामगार मंत्री आकाश फुंडकर, अमानोरा फाउंडेशनचे अनिरुद्ध देशपांडे व डॉ. आयुषी देशमुख उपस्थित होते.
भटक्या-विमुक्त समाजाला दयेने नव्हे, तर आपलेपणाच्या भावनेतून पाहण्याची गरज आहे. परिचय आणि आपलेपणाचा अभाव निर्माण झाल्याने समाजातील काही घटक मुख्य प्रवाहापासून दूर गेले. ही सामाजिक दरी दूर करून ‘हा समाज आपलाच आहे’ अशी भावना निर्माण झाली पाहिजे, असे भागवत यांनी सांगितले.
परकीय आक्रमणे आणि पारतंत्र्याच्या काळात भटक्या समाजाने मोठा संघर्ष केला. ब्रिटिशांनी या समाजातील अनेक घटकांना गुन्हेगार ठरविल्याचाही त्यांनी उल्लेख केला. समाजासाठी केलेले काम छोटे किंवा मोठे यापेक्षा ते कोणत्या भावनेतून केले जाते, हे महत्त्वाचे आहे. अशा प्रकल्पांना समाजाचा आधार मिळाला पाहिजे. ‘भटक्या-विमुक्त समाजाच्या उत्कर्षातच आपला उत्कर्ष आहे’, ही भावना प्रत्येकाच्या नेर्माण झाली पाहिजे, असे आवाहन डॉ. भागवत यांनी केले.



