
लोखंडी रॉडच्या घावांनी पत्नीचा खून; रक्ताच्या थारोळ्यात उभा राहून पती म्हणाला… “मीच तिला मारलं !”
MH 28 News Live / खामगाव : शहरातील रेल्वे गेटजवळील झोपडपट्टी परिसरात गुरुवारी मध्यरात्री घडलेल्या एका थरारक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला. घरगुती वादातून संतापलेल्या पतीने पत्नीच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार करत तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी खामगाव शहर पोलिसांनी आरोपी पतीला तात्काळ अटक केली आहे.

सविता प्रकाश सोळंके (वय २२) असे मृत महिलेचे नाव असून प्रकाश सोळंके (वय २५) असे आरोपी पतीचे नाव आहे. दोघेही रेल्वे गेटजवळील झोपडपट्टी परिसरात वास्तव्यास होते. गुरुवारी रात्री बारा वाजताच्या सुमारास पती-पत्नीमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, संतापाच्या भरात प्रकाश सोळंके याने घरात असलेल्या लोखंडी रॉडने सविताच्या डोक्यावर जोरदार वार केले. गंभीर दुखापत झाल्याने सविता रक्ताच्या थारोळ्यात कोसळली आणि तिचा जागीच मृत्यू झाला.

घटनेदरम्यान शेजारी राहणारे संजय मेढे यांनी सविताच्या किंचाळण्याचा आवाज ऐकून आरोपीच्या घरी धाव घेतली. तेव्हा सविता जमिनीवर रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती, तर प्रकाश सोळंके हा हातात लोखंडी रॉड घेऊन मृतदेहाजवळ उभा होता. “हे तू काय केले?” अशी विचारणा केल्यावर आरोपीने थंड डोक्याने “मी सविताला मारलं आहे, आता मी स्वतः पोलीस स्टेशनला जातो,” असे सांगत तेथून निघून गेल्याची माहिती फिर्यादीने पोलिसांना दिली.

घटनेची माहिती मिळताच खामगाव शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार रामकृष्ण पवार आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला तसेच आरोपीला अटक केली. या घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलीस निरीक्षक विकास पाटील पुढील तपास करीत आहेत.



