♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

चिखलीत पोलिसांचा धडाका; घरातून तब्बल २.७८ किलो गांजा जप्त, एक आरोपी जाळ्यात

MH 28 News Live / चिखली शहरातील राऊतवाडी परिसरात पोलिसांनी अमली पदार्थांविरोधात धडाकेबाज कारवाई करत एका घरावर छापा टाकून तब्बल २ किलो ७८० ग्रॅम गांजा सदृश्य पदार्थ जप्त केला. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून अवैध अमली पदार्थांच्या व्यापाराला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

आज संध्याकाळी सुमारे ८.३० वाजताच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली. पवन चंपालाल रामावत (वय ३५, रा. राऊतवाडी, चिखली) याच्या राहत्या घरावर अचानक छापा टाकण्यात आला. घराची सखोल झडती घेत असताना गांजा सदृश्य पुड्या आढळून आल्या. पोलिसांनी तत्काळ हा मुद्देमाल जप्त केला असून जप्त मालाची अंदाजे किंमत १ लाख ४० हजार रुपये असल्याची माहिती समोर आली आहे. संपूर्ण कारवाई नायब तहसीलदार मुरलीधर गायकवाड तसेच शासकीय पंचांच्या उपस्थितीत पार पडली. पंचनामा करून मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला असून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार भूषण गावंडे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, पोलिसांच्या या धडाकेबाज मोहिमेमुळे अमली पदार्थ विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून परिसरातील अवैध धंद्यांवर पोलिसांचा कडक वचक बसल्याची चर्चा सुरू आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

या कारवाई शिवाय चिखली शहरात गौरक्षण वाडी परिसरात आणखी एका ठिकाणी पोलिसांनी छापा टाकून गांजा पकडल्याची माहिती आहे. त्याबद्दल अधिकृत वृतांत पोलीस विभागाकडून प्राप्त झाला नाही.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129