♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

समृद्धी महामार्गावर टायर फुटल्याने स्कॉर्पिओ पलटी; एक ठार, आठ जखमी

MH 28 News Live / चिखली : समृद्धी महामार्गाच्या नागपूर कॉरिडोरवरील चॅनल क्रमांक ३२५.३ येथे स्कॉर्पिओ कारचा मागील टायर अचानक फुटल्याने कार चालकाचे नियंत्रण सुटून ती पलटी झाल्याची घटना घडली. या भीषण अपघातात अमन साहू (वय २५) यांना गंभीर दुखापत झाली. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला, तर अन्य आठ जण किरकोळ जखमी झाले.

छत्रपती संभाजीनगर येथील सीआरओकडून अपघाताची माहिती मिळताच समृद्धी महामार्ग उपकेंद्राचे पोलिस पथक तातडीने घटनास्थळी रवाना झाले. पोलिस उपनिरीक्षक अनिता इर्शीद यांच्या नेतृत्वाखालील पथक दुपारी १२.०५ वाजता घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी सीजी ०८/बीसी ४४०५ क्रमांकाची स्कॉर्पिओ रस्त्यावर पलटी झालेल्या अवस्थेत आढळून आली.

कारचालक हेमंत विश्वकर्मा (वय २४, रा. राजनांदगाव, छत्तीसगड) यांच्याकडे चौकशी केली असता, ते आपल्या मित्रांसह नाशिकहून नागपूरकडे जात असल्याचे समोर आले. प्रवासादरम्यान कारच्या पाठीमागील डाव्या बाजूचा टायर अचानक फुटला. त्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार पलटी होऊन अपघात झाला.

या दुर्घटनेत तीकेस बंदे, रवी साहू, यश साहू, देवेश साहू, हेमंत विश्वकर्मा, वासू साहू, विकी साहू, किशन विश्वकर्मा आणि नवीन साहू यांना दुखापत झाली. सर्व जखमींना महामार्गावरील अॅम्ब्युलन्सच्या मदतीने सिंदखेडराजा येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यापैकी अमन साहू यांची प्रकृती गंभीर होती. उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.

दरम्यान, अपघातग्रस्त स्कॉर्पिओ क्रेनच्या सहाय्याने रस्त्यावरून हटवून दुसरबीड टोलनाका येथे लावण्यात आली. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू राहिली. पोलिसांनी घटनास्थळी परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले.

नाशिकमधील खड्ड्यांचाही गंभीर प्रश्न

दरम्यान, नाशिक शहरातील रस्त्यांची दुरवस्था आणि खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून शहरातील विविध रस्ते खोदून ठेवण्यात आले असून, अपेक्षित डागडुजी किंवा नवीन रस्त्यांची कामे वेळेत न झाल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याचा आरोप होत आहे.

महापालिका प्रशासन आणि सरकारने विविध कामे एकाच वेळी हाती घेतल्याने अनेक रस्त्यांची चाळण झाली आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे गेल्या चार महिन्यांत खड्ड्यांमुळे झालेल्या वेगवेगळ्या अपघातांत पाच निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागल्याचे सांगण्यात येते. मृतांमध्ये निलेश कोतकर, प्रभाकर निकम, दिपाली बेळे आणि प्रवीण गायकवाड यांचा समावेश आहे. त्यामुळे रस्त्यांवरील खड्डे बुजवून नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याची मागणी जोर धरत आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129