♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

‘मेरा’ परिसराची एसटीसाठी हाक; दरेगाव मुक्कामी बस सुरू करा, अन्यथा आंदोलनाचा इशारा

MH 28 News Live / चिखली : तालुक्यातील मेरा खुर्द, अंत्री खेडेकर, मेरा बुद्रुक व दरेगाव परिसरातील नागरिक, विद्यार्थी, शेतकरी, नोकरदार आणि महिलांच्या प्रवासाची गंभीर गैरसोय होत असल्याने चिखली आगारातून मेरा खुर्द–मेरा बुद्रुक मार्गे दरेगाव (मुक्कामी) बस सेवा तातडीने सुरू करण्यात यावी, अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यालय, बुलढाणा यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

सदर परिसरातील नागरिकांना दररोज चिखली येथे शिक्षण, नोकरी, शासकीय व खासगी कामांसाठी ये-जा करावी लागते. मात्र या मार्गावर नियमित व वेळेवर एसटी बस सेवा उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. विशेषतः विद्यार्थी व नोकरदारांना वेळेवर शाळा, महाविद्यालय व कार्यालयात पोहोचण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत असून, संध्याकाळच्या वेळी परतीच्या प्रवासासाठी मोठी समस्या निर्माण होत आहे.
निवेदनात सुचविण्यात आले आहे की, सकाळी चिखली –मेरा खुर्द – मेरा बुद्रुक – दरेगाव बस सेवा सुरू करून दरेगाव येथे मुक्काम ठेवण्यात यावा व दुसऱ्या दिवशी सकाळी दरेगाव–मेरा बुद्रुक–मेरा खुर्द–चिखली या मार्गाने परतीची सेवा सुरू करण्यात यावी. या बससेवेला परिसरातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळून प्रवाशांची संख्या वाढेल तसेच महामंडळाच्या उत्पन्नातही भर पडेल, असा विश्वास संघटनेने व्यक्त केला आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी, शेतकऱ्यांच्या बाजारपेठेतील ये-जा करण्यासाठी तसेच महिला व सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षित आणि परवडणाऱ्या प्रवासासाठी ही बस सेवा अत्यंत आवश्यक असल्याचे क्रांतिकारी शेतकरी संघटनेने म्हटले आहे.

नागरिक व प्रवाशांच्या सोयीचा विचार करून चिखली–मेरा खुर्द–मेरा बुद्रुक–दरेगाव (मुक्कामी) ही एसटी बस सेवा लवकरात लवकर सुरू करावी, अन्यथा परिसरातील नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन पुढील आंदोलनात्मक भूमिका घेण्यात येईल, असा इशाराही क्रांतिकारी शेतकरी संघटनेने दिला आहे.

यावेळी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अमोल मोरे, नितीन सोनटक्के, शिवदास खिरोडकार, अतुल खिरोडकार इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129