♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

” या तांदळाची खिचडी तहसीलदारांनी बायका पोरांसोबत खावी; मग आम्ही सुद्धा खाऊ ” संतप्त नागरिकांनी चिखली तहसीलदारांच्या कॅबिनसमोर ओतला निकृष्ट दर्जाचा रेशनचा तांदूळ

MH 28 News Live / चिखली : ” या तांदळाची खिचडी तहसीलदारांनी बायका पोरांसोबत खावी; मग आम्ही सुद्धा खाऊ ” अशा शब्दात आपला संताप व्यक्त करत सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या ढिसाळ कारभाराविरोधात चिखलीत काही नागरिक सोमवार, दि. २४ ऑगस्ट रोजी थेट तहसील कार्यालयाच्या दारात पोहोचले. रेशन दुकानातून वाटप करण्यात आलेले निकृष्ट दर्जाचे तांदूळ हातात घेऊन संतप्त नागरिकांनी चक्क तहसीलदारांच्या कॅबीनसमोरच ते ओतून देत ” या तांदळाची खिचडी तहसीलदारांनी बायका पोरांसोबत खावी; मग आम्ही सुद्धा खाऊ ” असे म्हणत प्रशासनाच्या कारभाराचा तीव्र निषेध नोंदवला. या अनोख्या आंदोलनामुळे महसूल व पुरवठा विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

स्थानिक स्वस्त धान्य दुकानातून शासनामार्फत वितरित होणारे धान्य अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून सातत्याने होत आहेत. याच पार्श्वभूमीवर एका नागरिकाला वितरित करण्यात आलेले तांदूळ खराब, चुरियुक्त आणि खाण्यायोग्य नसल्याचा आरोप करण्यात आला. संतापलेल्या नागरिकाने हे धान्य थेट तहसील कार्यालयात आणले आणि तहसीलदारांच्या कॅबीनसमोर ओतून आपला रोष व्यक्त केला. “जे धान्य जनावरेही खाणार नाहीत, ते माणसांच्या ताटात देऊन त्यांच्या आरोग्याशी खेळणार का ?” असा संतप्त सवाल यावेळी करण्यात आला. रेशनच्या माध्यमातून गरीब आणि गरजू कुटुंबांना मिळणारे धान्य जर दर्जाहीन असेल, तर त्याची जबाबदारी नेमकी कोणाची? धान्याचा दर्जा तपासण्याची यंत्रणा केवळ कागदावरच आहे का, असा सवालही या घटनेनंतर उपस्थित झाला आहे.

सर्वसामान्य नागरिकांच्या अन्नाच्या हक्काशी संबंधित असलेल्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेत अशा प्रकारचा निष्काळजीपणा खपवून घेतला जाऊ नये, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. धान्याचा दर्जा तपासणे, निकृष्ट धान्याचा पुरवठा कुठून झाला याची चौकशी करणे आणि दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करणे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

या प्रकारामुळे तहसील कार्यालयातील प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली. नागरिकाची तक्रार गांभीर्याने घेतल्याचे पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. “सदरील व्यक्तीची तक्रार आम्ही गांभीर्याने घेतली असून, यासंदर्भातील तक्रार वरिष्ठांना कळविण्यात येईल. तसेच, भविष्यात धान्य पुरवठा सुरळीत राहून नागरिकांना चांगल्या दर्जाचे धान्य मिळण्यासाठी योग्य तो प्रयत्न केला जाईल,” अशी माहिती चिखलीच्या पुरवठा निरीक्षक प्रियंका सोनूकुसळे यांनी दिली.

मात्र, केवळ तक्रार स्वीकारून किंवा वरिष्ठांना कळवून प्रश्न सुटणार का, हा खरा सवाल आहे. निकृष्ट धान्याचा पुरवठा नेमका कुठून झाला, संबंधित रेशन दुकानातील धान्याचा साठा तपासला जाणार का, दोषींवर कारवाई होणार का आणि भविष्यात लाभार्थ्यांना दर्जेदार धान्य मिळणार का, याकडे आता संपूर्ण तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. रेशनच्या तांदळाचा प्रश्न आता केवळ एका नागरिकाच्या तक्रारीपुरता राहिलेला नसून, गरीबांच्या ताटातील अन्नाच्या गुणवत्तेचा गंभीर प्रश्न बनला आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129