
पैशांच्या वादातून महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप; चिखली तालुक्यात खळबळ
MH 28 News Live / चिखली / तालुक्यातील मेरा खुर्द परिसरात पैशांच्या वादातून एका विवाहित महिलेला सतत मानसिक त्रास व धमक्या देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सुलताना बी सलीम शेख हिच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुक्तार शाह अकबर शाठ (वय ५४, रा. मेरा खुर्द) यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, त्यांची मुलगी रुबीना बी अकिल शाह हिच्या ओळखीतील सुलताना बी सलीम शेख हिने दोन वर्षांपूर्वी शगुप्ता फकीरा मेख हिला 30 हजार रुपये दिले होते. या व्यवहारात रुबीना बी ही मध्यस्थी होती. मात्र संबंधित रक्कम परत न मिळाल्याने सुलताना बी ही रुबीना बी हिला सतत पैशांसाठी त्रास देत होती. “तू मध्यस्थी केलीस, त्यामुळे पैसे तूच परत कर, अन्यथा तुला व तुझ्या मुलांना घराबाहेर काढीन, घराला कुलूप लावीन तसेच जीवे मारण्याची धमकी देईन,” अशा स्वरूपाच्या धमक्या दिल्या जात असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

कुटुंबीयांनी अनेकदा समजावून सांगूनही सुलताना बी हीने त्रास देणे सुरूच ठेवले होते. या मानसिक त्रासामुळे रुबीना बी सतत तणावाखाली असल्याचे तिच्या कुटुंबीयांनी सांगितले. दरम्यान, ६ मे रोजी सायंकाळी पुन्हा घरासमोर वाद घालून अपमानित करण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर रुबीना बी अस्वस्थ अवस्थेत होती, अशी माहिती तिच्या मुलीने नातेवाईकांना दिली.
७ मे रोजी सकाळी कुटुंबीयांना फोनद्वारे माहिती मिळाल्यानंतर ते चिखली येथील सरकारी रुग्णालयात पोहोचले असता रुबीना बी मृतावस्थेत आढळून आली. रात्री घरातील सदस्य झोपल्यानंतर तिने दिपक खरात यांच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेप्रकरणी “सततचा मानसिक छळ व धमक्यांमुळे आत्महत्येस प्रवृत्त केले” असा आरोप करत सुलताना बी सलीम शेख हिच्याविरोधात कारवाईची मागणी करण्यात आली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.



