♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

शेगावातील हॉटेलमालकाचा घृणास्पद प्रकार; महिलांचे गुप्त व्हिडिओ काढून ब्लॅकमेल, लैंगिक अत्याचारप्रकरणी अटक

MH 28 News Live / शेगाव : येथून महिलांच्या सुरक्षेला हादरा देणारी संतापजनक घटना समोर आली आहे. शहरातील एका प्रसिद्ध हॉटेलच्या मालकाने आपल्या हॉटेलमध्ये काम करणाऱ्या महिलांचे गुप्तपणे आंघोळ करतानाचे फोटो आणि व्हिडिओ चित्रीत करून त्यांचा गैरवापर केल्याचा गंभीर आरोप उघडकीस आला आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शेगाव-खामगाव मार्गावरील एका हॉटेलमध्ये अनेक महिला कर्मचारी कार्यरत आहेत. हॉटेलचा मालक ज्ञानेश्वर लिप्ते याने एका महिला कर्मचाऱ्याचे खासगी क्षण चोरून मोबाईलमध्ये कैद केले. त्यानंतर संबंधित फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत पीडित महिलेला ब्लॅकमेल करण्यात आल्याचा आरोप आहे. तक्रारीनुसार, आरोपीने या भीतीचा फायदा घेत संबंधित महिलेवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचेही समोर आले आहे.

सततच्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून पीडित महिलेने अखेर धाडस दाखवत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पीडितेने आरोपीकडून जातीवाचक शिवीगाळ करून मानसिक छळ करण्यात आल्याचाही आरोप केला आहे. तसेच हॉटेलमध्ये काम करणाऱ्या इतर काही महिलांनाही अशाच प्रकारे त्रास दिल्याची चर्चा स्थानिक स्तरावर सुरू आहे.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शेगाव पोलीस यांनी तातडीने कारवाई करत आरोपी ज्ञानेश्वर लिप्ते याच्याविरुद्ध बलात्कार, विनयभंग तसेच ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्या मोबाईलची सखोल तपासणी सुरू आहे. आणखी काही महिलांचे व्हिडिओ किंवा अन्य पुरावे समोर येतात का, याचाही तपास पोलीस करत आहेत. संतांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगावमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. आर्थिक गरजेमुळे काम करणाऱ्या महिलांचा गैरफायदा घेणाऱ्या आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129