
मासरूळच्या धरणात बुडून सरपंचपुत्राचा मृत्यू ! पाइपलाइन जोडण्यासाठी उतरले होते पाण्यात; दोन सहकारी सुखरूप बचावले, सायंकाळी सहा वाजता आढळला मृतदेह
MH 28 News Live / धाड : बुलढाणा तालुक्यातील मासरूळ येथील धरणात बुडून सरपंचपुत्राचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली. मधुकर गणपत महाले असे मृत युवकाचे नाव आहे. धरणातून पाणीपुरवठ्यासाठी टाकण्यात आलेली पाइपलाइन जोडण्याच्या कामासाठी मधुकर महाले हे दोन सहकाऱ्यांसह गुरुवारी दुपारी सुमारे दोन वाजता धरणाच्या पाण्यात उतरले होते. पाइपलाइनच्या दिशेने पोहत जात असताना दमछाक झाल्याने मधुकर यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. सुदैवाने त्यांच्यासोबत असलेले दोघे सहकारी सुखरूप बचावले. घटनेची माहिती मिळताच महसूल प्रशासनाने बुलढाणा तहसीलदारांमार्फत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाला कळविले. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. देवरे आणि जिल्हा आपत्ती निवारण अधिकारी संभाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. गुरुवारी दुपारपासून धरणात शोधमोहीम राबविण्यात आली. अखेर सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मधुकर महाले यांचा मृतदेह शोध पथकाच्या हाती लागला. या दुर्दैवी घटनेमुळे मासरूळ परिसरात हळहळ व्यक्त होत असून, महाले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.



