♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

अखेर बालकदिनी सोलर प्लांट कार्यान्वित ! ​माजी कृषी सभापती राजेंद्र पळसकर यांच्या प्रयत्नांना यश; पेढे वाटून आनंदोत्सव साजरा

MH 28 News Live / ​डोणगाव : मेहकर तालुक्यातील कन्हाळवाडी येथे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत उभारण्यात येणारा ६ मेगावाट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प अखेर बालकदिनी कार्यान्वित झाला आहे. गेल्या चार वर्षांपासून रखडलेल्या या प्रकल्पासाठी माजी जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती राजेंद्र पळसकर यांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यांच्या या पाठपुराव्याला यश आल्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण असून, यानिमित्ताने पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. ​

२७ एकर क्षेत्रामध्ये उभारण्यात येत असलेल्या या प्रकल्पामुळे डोणगाव , पांगरखेड आणि मादणी येथील शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा उपलब्ध होण्याची प्रतीक्षा होती. मात्र, प्रशासकीय दिरंगाईमुळे गेल्या चार वर्षांपासून या प्रकल्पाचे काम रखडले होते. राजेंद्र पळसकर यांनी प्रशासनाच्या या दिरंगाईविरोधात आक्रमक भूमिका घेत आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर प्रशासकीय हालचाली वेगाने होऊन, ३ नोव्हेंबर रोजी कामाला पुन्हा सुरुवात झाली होती. सध्या तूर पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रीच्या वीजपुरवठ्यावर अवलंबून राहावे लागत होते. रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देताना अपव्यय होत असे. आता हा सौर प्रकल्प कार्यान्वित झाल्यामुळे शेतकऱ्यांचे रात्रीचे जागरण कमी होण्यासोबतच पाण्याचीही मोठी बचत होणार आहे. ​प्रकल्पाच्या या यशस्वी वाटचालीबद्दल आणि प्रत्यक्षात प्रकल्प सुरू झाल्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त करत पेढे वाटून पेढे भरवले व एकच जल्लोष केला.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129