
“भीक नको, पण कुत्रं आवर !” पाच हजारांसाठी शेतकऱ्यांचा स्वाभिमान किती वेळा पायदळी तुडवणार ? संतोष भुतेकर यांचा प्रशासनाला निर्वाणीचा इशारा ! दुष्काळी अग्रीम मदतीसाठी शेतकऱ्यांचे तहसील कार्यालयात हेलपाटे; प्रशासनाच्या कारभाराविरोधात संतापाचा उद्रेक
MH 28 News Live / चिखली : दुष्काळाचे संकट, शेतीमालाला कमी भाव, उत्पादनात घट आणि कर्जाचा डोंगर अशा संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेली पाच हजार रुपयांची अग्रीम मदत मिळवण्यासाठीही तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. भरोसा भाग-१ सह तालुक्यातील अनेक गावांतील शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप मदत जमा न झाल्याने संताप व्यक्त होत आहे. या प्रश्नावर युवासेना उपजिल्हाप्रमुख संतोष पाटील भुतेकर यांनी वंचित शेतकऱ्यांसह तहसीलदारांना निवेदन दिले.
पाच हजारांसाठी शेतकऱ्यांची फरफट
अग्रीम टॅग, फार्मर आयडी, ई-केवायसी अशा तांत्रिक अडचणींची कारणे सांगून शेतकऱ्यांना वारंवार तहसील कार्यालयात चकरा माराव्या लागत आहेत. शेतीची कामे सोडून प्रवासाचा खर्च करीत दिवसभर कार्यालयात थांबण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. शासनाने जाहीर केलेली हक्काची मदत मिळवण्यासाठी एवढी धावपळ का करावी, असा सवाल उपस्थित होत आहे.
प्रशासनाने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे !
तालुक्यातील प्रत्येक गावातील तलाठ्यांमार्फत मदतीपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांची गावनिहाय यादी तयार करावी, मदत प्रलंबित राहण्याची कारणे शोधावीत आणि तांत्रिक त्रुटी तातडीने दूर कराव्यात, अशी मागणी भुतेकर यांनी केली. शेतकऱ्यांना कार्यालयात बोलावण्याऐवजी तलाठी व कर्मचाऱ्यांनी गावपातळीवर जाऊन आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून घ्यावी, अशीही मागणी करण्यात आली.
आंदोलनाचा इशारा!
“शेतकरी भीक मागत नाही, तर शासनाने जाहीर केलेली आपल्या हक्काची मदत मागत आहे. पाच हजार रुपयांसाठी त्याच्या वेळेची, पैशांची आणि स्वाभिमानाची परीक्षा घेऊ नका. प्रशासनाने तांत्रिक अडचणी दूर करून मदत थेट खात्यात जमा करावी,” अशी भूमिका संतोष भुतेकर यांनी मांडली. निवेदनाची तातडीने दखल न घेतल्यास वंचित शेतकऱ्यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी क्रांतिकारी संघटनेचे शेतकरी नेते विनायक सरनाईक, उद्धव पाटील तुटे, माजी सरपंच गणेश थुट्टे, समाधान ऊसर, गणेश ऊसर, मधुकर ऊसर, शेषराव जाधव, विलास ऊसर, नंदकिशोर लेंडे, विष्णू होळकर, तुकाराम ऊसर, विष्णू भुतेकर, भरत भुतेकर यांच्यासह असंख्य शेतकरी उपस्थित होते.



