♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

लोणी गवळीत डेंग्यू सदृश्य तापाची साथ; सव्वा वर्षीय बालकासह ग्रामस्थ तापाच्या गर्तेत ! डोणगाव परिसरात भीतीचे वातावरण; आरोग्य विभागाच्या उपाययोजनांकडे ग्रामस्थांचे लक्ष, तातडीने सर्वेक्षण व फॉगिंग करण्याची मागणी

 

MH 28 News Live / डोणगाव : परिसरातील लोणी गवळी गावात गेल्या काही दिवसांपासून डेंग्यू सदृश्य तापाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असून, घरोघरी नागरिक तापाने फणफणत असल्याचे चित्र आहे. या साथीमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका सव्वा वर्षीय बालकाला तीव्र तापाची लक्षणे जाणवू लागल्याने पालकांनी त्याला तातडीने बुलढाणा येथे उपचारासाठी हलविले. उपचारानंतर बालकाच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याची माहिती आहे.

आरोग्य यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

गावात तापाच्या रुग्णांची संख्या वाढत असताना अद्याप व्यापक आरोग्य सर्वेक्षण झाले नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. साथीचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून वेळीच ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोपही ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने तातडीने गावात घरोघरी सर्वेक्षण करून तापाच्या रुग्णांची तपासणी करावी, अशी मागणी होत आहे.

फॉगिंगसह आरोग्य शिबिराची मागणी

गावात तातडीने आरोग्य शिबिर आयोजित करून नागरिकांची तपासणी व आवश्यक औषधोपचार सुरू करावेत. डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी धूरफवारणी (फॉगिंग) आणि औषध फवारणी करावी. तसेच पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची तपासणी करून नागरिकांमध्ये स्वच्छता व आरोग्यविषयक जनजागृती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. आरोग्य विभागाने या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना न केल्यास साथीचा फैलाव वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129