♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

मध्य प्रदेशातील भूकंपाचे धक्के बुलढाणा जिल्ह्यापर्यंत; जळगाव जामोद, संग्रामपूरमध्ये नागरिकांना हादरे !

MH 28 News Live / बुलढाणा : मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात आज (१४ नोव्हेंबर) सकाळी ४.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाल्याने महाराष्ट्रातील सीमावर्ती भागांमध्येही त्याचे हादरे जाणवले. बुलढाणा आणि जळगाव जिल्ह्यातील काही भागांत नागरिकांना भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. सकाळी ९ वाजून १६ मिनिटांच्या सुमारास मध्य प्रदेशातील खरगोन परिसरात भूकंपाची नोंद झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

या भूकंपाचे धक्के जळगाव जिल्ह्यातील जळगाव शहर, भुसावळ, रावेर, यावल, सावदा आणि जामनेर परिसरात जाणवल्याचे समजते. अचानक जमीन हादरल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली. काही ठिकाणी घरातील वस्तू हलल्याचेही नागरिकांनी अनुभवले.

दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यांमध्येही सकाळी ९ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती समोर आली आहे. अचानक झालेल्या या हालचालीमुळे नागरिकांमध्ये काही काळ चिंतेचे वातावरण होते.

सुदैवाने, या भूकंपामुळे बुलढाणा किंवा जळगाव जिल्ह्यात कोणतीही जीवितहानी अथवा वित्तहानी झाल्याचे वृत्त अद्याप प्राप्त झालेले नाही. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे. भूकंपाचे धक्के जाणवल्यास इमारतीबाहेरील मोकळ्या आणि सुरक्षित जागेचा आश्रय घ्यावा, तसेच लिफ्टचा वापर टाळावा.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129