
पलटी झालेला ट्रक पाहण्यासाठी कार थांबविल्या अन् मागून भरधाव ट्रक घुसला; समृद्धी महामार्गावर भीषण साखळी अपघात ! २५ हून अधिक कार एकमेकांवर आदळल्या
MH 28 News Live / देऊळगाव राजा :
समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नसून, शुक्रवारी सकाळी घडलेल्या भीषण साखळी अपघाताने महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. हिवरखेड पूर्णा ते तढेगावदरम्यान चॅनल क्रमांक ३२१.९०० वरील पुलावर सिमेंट मिक्सिंग ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक बॅरिगेट्सला धडकून पलटी झाला. या अपघातानंतर घटनास्थळी निर्माण झालेली गर्दी आणि अपघात पाहण्यासाठी रस्त्यावर थांबविलेल्या कारच्या रांगा पुढील मोठ्या अपघाताला कारणीभूत ठरल्या. मागून भरधाव आलेल्या एका ट्रकने उभ्या असलेल्या कारना जोरदार धडक दिल्याने तब्बल २५ हून अधिक कारचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सुदैवाने या संपूर्ण घटनाक्रमात कोणालाही गंभीर दुखापत झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला.
प्राप्त माहितीनुसार, इमरान अन्सारी मिराज अन्सारी (वय २४, रा. पनवेल) हा चालक अमरावती येथून मुंबईच्या दिशेने सिमेंट मिक्सिंग ट्रक घेऊन जात होता. शुक्रवारी सकाळी सुमारे ६.३० वाजताच्या सुमारास हिवरखेड पूर्णा ते तढेगावदरम्यान चॅनल क्रमांक ३२१.९०० वरील पुलावर अचानक त्याचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रक महामार्गाच्या बाजूला असलेल्या बॅरिगेट्सला जोरदार धडक देऊन रस्त्यावर पलटी झाला. या अपघातात ट्रकमधील सिमेंट रस्त्यावर विखुरले गेले. दरम्यान, सोनोशी येथील गजानन नागरे हे पुण्याकडे जात असताना त्यांनी आपले वाहन थांबवून ट्रकचालकाला बाहेर काढण्यास मदत केली. अपघातग्रस्त ट्रक बाजूला काढण्यासाठी आणि वाहतुकीला अडथळा होऊ नये म्हणून मागून येणारी वाहने थांबविण्यात आली होती.
अपघात पाहण्याच्या उत्सुकतेत कारच्या रांगा; भरधाव ट्रकची जोरदार धडक
पहिल्या अपघाताची माहिती घेण्यासाठी आणि अपघातग्रस्तांना मदतीची गरज आहे का, हे पाहण्यासाठी अनेक वाहनचालकांनी उत्सुकतेपोटी आपापल्या कार रस्त्यावर थांबविल्या. त्यामुळे घटनास्थळाच्या परिसरात कारच्या लांबच लांब रांगा लागल्या. याचवेळी मागून वेगाने आलेल्या एका ट्रकने या रांगेतील कारना जोरदार धडक दिली. धडक दिल्यानंतर संबंधित ट्रक घटनास्थळावरून पसार झाल्याचे सांगण्यात येत आहे. ट्रकच्या धडकेमुळे रांगेतील कार एकापाठोपाठ एक पुढील वाहनांवर आदळल्या आणि काही क्षणांतच महामार्गावर वाहनांचा मोठा ढिगारा तयार झाला. या साखळी धडकेत २५ हून अधिक कारचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
काही कारचालक घटनास्थळावरून रवाना; नुकसानीचा नेमका आकडा अस्पष्ट
या अपघातात काही कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, तर काही वाहनांना किरकोळ खरचटले आहे. किरकोळ नुकसान झालेल्या काही कारचालकांनी घटनास्थळावरून पुढील प्रवास सुरू केल्याने अपघातात नेमक्या किती वाहनांचे नुकसान झाले, याचा निश्चित आकडा समोर आलेला नाही. प्रत्यक्ष पाहणी आणि संबंधित वाहनांच्या नुकसानीचे मूल्यांकन झाल्यानंतरच या साखळी अपघाताची व्याप्ती स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
पोलीस व आरोग्य पथकाची धाव; मोठी जीवितहानी टळली
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि आरोग्य विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. किरकोळ जखमींना वैद्यकीय उपचार देण्यात आले. सुदैवाने या संपूर्ण घटनाक्रमात कोणालाही गंभीर दुखापत झाली नसल्याची माहिती आहे. दरम्यान, अपघातग्रस्त ट्रक आणि कार महामार्गावरून बाजूला हटविण्याचे काम हाती घेण्यात आले. वाहतूक पूर्णपणे विस्कळीत होऊ नये, यासाठी पोलिसांनी खबरदारी घेत एका बाजूने वाहतूक सुरू ठेवली.
अपघात पाहण्यासाठी वाहन थांबविणे ठरू शकते जीवघेणे
समृद्धी महामार्गावरील या घटनेने वाहनचालकांच्या निष्काळजीपणाचा गंभीर मुद्दा समोर आणला आहे. महामार्गावर अपघात घडल्यानंतर केवळ उत्सुकतेपोटी स्वतःचे वाहन रस्त्यावर थांबवून अपघात पाहणे इतर प्रवाशांच्या जीवावर बेतू शकते, हे या घटनेतून स्पष्ट झाले आहे. अपघातग्रस्तांना मदत करण्याची भावना निश्चितच महत्त्वाची असली, तरी त्यासाठी वाहतुकीला अडथळा निर्माण न करता सुरक्षित अंतर राखणे आणि आपत्कालीन यंत्रणांना माहिती देणे आवश्यक आहे. एका अपघातानंतर निर्माण झालेल्या गर्दीमुळे दुसरा आणि अधिक भीषण अपघात घडू शकतो, याची जाणीव प्रत्येक वाहनचालकाने ठेवणे गरजेचे आहे.



