
“सत्तेतील नेत्यांनो, हवे तर आमच्याकडून १०-१५ टक्के कमिशन घ्या; पण शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मिळवून द्या !” निमगावच्या सभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून रविकांत तुपकरांचा सत्ताधाऱ्यांना खोचक टोला ! दुष्काळ संघर्ष यात्रेला गावागावांतून मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद
MH 28 News Live / नांदुरा : “सत्ताधारी नेते शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलत नाहीत, कारण शेतकऱ्यांना मदत मिळवून दिली तर त्यात १५-२० टक्के कमिशन मिळत नाही! ज्या कामात कमिशन मिळते, तीच कामे करण्याकडे नेत्यांचा कल असतो. म्हणून मी सत्ताधाऱ्यांना सांगतो, तुम्हाला हवे तर आमच्याकडून १० टक्के कमिशन घ्या; पण दुष्काळाने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची मदत, तीही हेक्टरची कोणतीही मर्यादा न घालता मिळवून द्या!” अशा शब्दांत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सत्ताधाऱ्यांवर उपरोधिक टीकेची झोड उठवली. निमित्त होते दुष्काळ संघर्ष यात्रेच्या दुसऱ्या दिवशी नांदुरा तालुक्यातील निमगाव येथे झालेल्या जाहीर सभेचे! १५ नोव्हेंबरच्या रात्री झालेल्या या सभेला शेतकऱ्यांची प्रचंड गर्दी उसळली होती. तुपकरांनी आपल्या भाषणातून सरकारच्या शेतकरीविषयक धोरणांवर टीका करत दुष्काळग्रस्तांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले.
शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी १४ नोव्हेंबरला मलकापूर येथून सुरू झालेली रविकांत तुपकर यांची दुष्काळ संघर्ष यात्रा आता गावागावांत पोहोचत आहे. यात्रेला मिळणारा प्रतिसाद लक्षवेधी ठरत असून, शेतकरी, शेतमजूर, भूमिहीन नागरिक आणि महिलांचा सहभाग पाहायला मिळत आहे. सकाळपासून सुरू होणारी यात्रा रात्री उशिरापर्यंत सुरू असते. दिवसभर गावोगावी भेटी, शेतकऱ्यांशी संवाद, त्यांच्या अडचणी जाणून घेणे आणि ठिकठिकाणी कॉर्नर सभा असा यात्रेचा कार्यक्रम सुरू आहे.
सकाळी माकनेरमधून सुरुवात; रात्री निमगावात शेतकऱ्यांची गर्दी!
दुष्काळ संघर्ष यात्रेचा दुसरा दिवस रविवार, १५ नोव्हेंबर रोजी चांगलाच गाजला. सकाळी ९ वाजता माकनेर येथून दिवसाच्या नियोजित कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर काटी, विटाळी, सिरसोडी, चांदूरबिस्वा येथे यात्रा पोहोचली.दुपारी दिघी येथे भोजनासाठी थांबा घेण्यात आला. त्यानंतर सायंकाळी ४ वाजता वडनेर, ५ वाजता अलमपूर आणि रात्री निमगाव येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते.
गावोगावी यात्रेचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी तुपकरांची भेट घेऊन आपल्या समस्या मांडल्या. दुष्काळामुळे निर्माण झालेली आर्थिक कोंडी, शेतमालाचे कोसळलेले भाव, कर्जाचा वाढता बोजा आणि पीक नुकसानीचे प्रश्न या संवादातून पुढे आले. दिवसभराच्या धावपळीनंतर निमगाव येथे झालेल्या सभेला मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. रात्रीच्या वेळीही शेतकऱ्यांनी दाखवलेली उपस्थिती हे या यात्रेचे विशेष वैशिष्ट्य ठरले.
“शेतकऱ्यांच्या मदतीत कमिशन नाही, म्हणून सत्ताधारी गप्प आहेत का ?”
निमगाव येथील सभेत रविकांत तुपकरांनी सत्ताधारी नेत्यांवर जोरदार टीका केली. दुष्काळामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला असताना लोकप्रतिनिधी त्यांच्या मागण्यांसाठी पुरेशा ताकदीने आवाज उठवत नसल्याचा आरोप त्यांनी केला.“शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलायला सत्ताधारी नेते तयार नाहीत. कारण त्यात १५ टक्के, २० टक्के कमिशन मिळत नाही. जिथे कमिशन मिळते, तिथेच नेते काम करतात. मग आम्हीच सांगतो, आमच्याकडून १० टक्के कमिशन घ्या; पण आमच्या शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची मदत मिळवून द्या. त्यासाठी हेक्टरची मर्यादाही घालू नका,” असा उपरोधिक टोला तुपकरांनी लगावला.
“शेतकऱ्यांना पाच हजारांची मदत नको, हक्काची नुकसानभरपाई द्या !”
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून जाहीर होणारी तुटपुंजी मदत शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या तुलनेत अपुरी असल्याची भूमिका तुपकरांनी मांडली . हेक्टरी एक लाख रुपयांची मदत देताना जमिनीच्या क्षेत्राची मर्यादा लागू करू नये. याशिवाय शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान, कापूस आणि सोयाबीनला योग्य भाव, पीकविम्याची पूर्ण नुकसानभरपाई, तसेच मायक्रोफायनान्स कंपन्यांकडून सुरू असलेली सक्तीची कर्जवसुली थांबवावी, अशा विविध मागण्यांचा तुपकरांनी पुनरुच्चार केला. शेतकऱ्यांसोबतच शेतमजूर, भूमिहीन आणि मेंढपाळांच्या प्रश्नांनाही या आंदोलनात स्थान देण्यात आले आहे. मेंढपाळांच्या आंतरजिल्हा चराईवरील निर्बंध हटवावेत आणि दुष्काळामुळे संकटात सापडलेल्या पशुपालकांसाठी विशेष पॅकेज जाहीर करावे, अशी मागणीही तुपकरांनी केली आहे.
दिवसभराचा थकवा, तरीही रात्री उशिरापर्यंत सभा
दुष्काळ संघर्ष यात्रेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तुपकरांचा दिवसभराचा दौरा. सकाळी ८ वाजल्यापासून गावोगावी भेटी सुरू होतात. शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेणे, त्यांच्याशी चर्चा करणे, छोटेखानी सभा घेणे आणि पुढील गावाकडे मार्गस्थ होणे, असा कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत सुरू असतो.यात्रेच्या दुसऱ्या दिवशीही हाच अनुभव आला. माकनेरपासून निमगावपर्यंत नऊ गावांचा कार्यक्रम आखण्यात आला होता. प्रत्येक गावात शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. दिवसभराच्या व्यस्त कार्यक्रमानंतरही निमगावच्या सभेत तुपकरांनी आक्रमक भाषण करत सरकारला जाब विचारला.
आता लक्ष्य ४ डिसेंबरचे बुलढाणा !
१४ नोव्हेंबरपासून सुरू झालेली दुष्काळ संघर्ष यात्रा ४ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील तेराही तालुक्यांमधून मार्गक्रमण करणार आहे. यात्रेदरम्यान गावागावांतील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत आंदोलनाची पुढील दिशा निश्चित केली जात आहे.४ डिसेंबरला बुलढाणा येथे एल्गार महामोर्चाचे आयोजन करण्यात आले असून, त्यासाठी जिल्हाभरातील शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन तुपकरांनी केले आहे.



