♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीची होणार चौकशी ! चिखली पालिकेतील आर्थिक अनियमिततेच्या आरोपांची जिल्हाधिकाऱ्यांकडून दखल; चौकशी अधिकाऱ्यांची नियुक्ती, सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश !

 

MH 28 News Live / चिखली : नगरपरिषदेमार्फत राबविण्यात आलेल्या भटक्या कुत्र्यांच्या नसबंदी योजनेत कथित आर्थिक अनियमितता आणि गंभीर गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारीची जिल्हाधिकारी कार्यालयाने दखल घेतली आहे. या प्रकरणाची वस्तुनिष्ठ, निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्यासाठी चौकशी अधिकारी म्हणून बुलढाण्याच्या उपविभागीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नगर विकास विभागाने ६ नोव्हेंबर २०२६ रोजी यासंदर्भात अधिकृत आदेश जारी केला आहे.

चिखली येथील राजा टॉवर परिसरातील रहिवासी सचिन सुभाष राठी यांनी १९ ऑक्टोबर २०२६ रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे यासंदर्भात तक्रार निवेदन सादर केले होते. चिखली नगरपरिषदेमार्फत राबविण्यात आलेल्या भटक्या कुत्र्यांच्या नसबंदी योजनेच्या अंमलबजावणीमध्ये आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच संबंधित कंत्राटदाराला देण्यात आलेली देयके, प्रत्यक्ष कामाची अंमलबजावणी दर्शविणारी कागदपत्रे आणि माहितीच्या अधिकारांतर्गत प्राप्त झालेल्या अभिलेखांच्या आधारे गंभीर स्वरूपाचे आक्षेप नोंदविण्यात आले आहेत.

या तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. चौकशीदरम्यान तक्रारीतील सर्व मुद्द्यांची वस्तुनिष्ठ पडताळणी करणे, संबंधित कागदपत्रांची तपासणी करणे, प्रत्यक्षात किती काम झाले आणि त्यासाठी किती खर्च करण्यात आला, याची खातरजमा करणे आवश्यक आहे. तसेच कंत्राटदाराला अदा करण्यात आलेली देयके आणि प्रत्यक्ष काम यामध्ये तफावत आहे किंवा नाही, याचीही सखोल तपासणी अपेक्षित आहे.

नियुक्त चौकशी अधिकाऱ्यांनी तक्रारीच्या अनुषंगाने सखोल चौकशी करून मुद्देनिहाय व वस्तुस्थितीदर्शक सविस्तर अहवाल आवश्यक कागदपत्रांच्या पुराव्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करावा, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या समस्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या नसबंदी योजनेतील कथित गैरव्यवहाराची आता प्रशासकीय पातळीवर चौकशी होणार असल्याने चिखली नगरपरिषदेच्या संबंधित कामकाजाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. या चौकशीतून नेमके काय निष्पन्न होते, योजनेच्या अंमलबजावणीत अनियमितता आढळते का आणि त्याला जबाबदार कोण, हे चौकशी अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129