
रोजगार वार्ता : ‘न्यू इंडिया अॅश्युरन्स’मध्ये ५०० प्रशिक्षणार्थी पदांची भरती
MH 28 News Live : पदवीधर तरुणांसाठी सुवर्णसंधी घेऊन आली आहे ‘न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी लिमिटेड’ने! देशभरात एकूण ५०० प्रशिक्षणार्थी पदांसाठी भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विविध राज्यांतील शाखांमध्ये ही संधी असून उमेदवारांना १२ महिन्यांच्या अॅप्रेंटिसशिप अंतर्गत प्रत्यक्ष प्रशिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे.
महाराष्ट्रात सर्वाधिक १२० पदे
महाराष्ट्रात (मुंबई, नागपूर, पुणे) एकूण १२० पदांसाठी भरती करण्यात येणार असून यामध्ये अजा – १२, अज – १०, इमाव – ३२, ईडब्ल्यूएस – १२ व खुल्या प्रवर्गासाठी ५४ पदांचा समावेश आहे. दिव्यांगांसाठी ५ पदे राखीव ठेवण्यात आली आहेत. इतर राज्यांमध्ये गोवा, गुजरात, आंध्रप्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश, तेलंगणा अशा विविध ठिकाणीही ही भरती होणार आहे.
पात्रता व वयोमर्यादा
अर्ज करण्यासाठी उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा (१ एप्रिल २०२१ नंतर उत्तीर्ण). वयोमर्यादा २१ ते ३० वर्षे असून मागासवर्गीय व विशेष प्रवर्गासाठी आरक्षणानुसार सवलत आहे. विशेषतः विधवा, घटस्फोटीत व विभक्त महिलांसाठी वयोमर्यादेत वाढ करण्यात आली आहे.
स्टायपेंड आणि प्रशिक्षण
१२ महिन्यांच्या प्रशिक्षण कालावधीत उमेदवारांना दरमहा ₹९,०००/- स्टायपेंड दिला जाईल. दर महिन्याला एका दिवसाची रजा मिळणार असून, प्रशिक्षणादरम्यान अनुपस्थित राहिल्यास त्याचा पगार परत करावा लागेल. प्रशिक्षण संपल्यानंतर उमेदवारांना थिअरॉटिकल आणि प्रॅक्टिकल असेसमेंट द्यावी लागेल. यानंतर अॅप्रेंटिसशिप सर्टिफिकेट दिले जाईल, जे भविष्यातील नोकरीसाठी उपयुक्त ठरेल.
निवड प्रक्रिया
दि. २६ जून २०२५ रोजी ऑनलाइन लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. एकूण १०० गुणांची परीक्षा ६० मिनिटांची असून, जनरल अवेअरनेस, इंग्रजी, गणित, लॉजिकल रिझनिंग आणि संगणक ज्ञान या विषयांचा समावेश असेल. परीक्षेनंतर स्थानिक भाषेची चाचणी घेतली जाईल. उमेदवाराने जर १०वी किंवा १२वीमध्ये ती भाषा शिकलेली असेल, तर या चाचणीतून सूट मिळू शकते.
अर्जाची अंतिम तारीख व शुल्क
अर्ज २० जून २०२५ पर्यंत https://nats.education.gov.in या संकेतस्थळावर करावा लागेल. शुल्क खुला व इमाव – ₹८००, अजा/अज/महिला – ₹६०० आणि दिव्यांग उमेदवारांसाठी ₹४०० आहे (GST वेगळा).
अधिक माहिती
भरतीसंदर्भातील सर्व प्रश्नांसाठी आणि तपशिलांसाठी http://newindia.co.in या संकेतस्थळावरील Information and Help सेक्शनला भेट द्यावी.
तरुणांनो, ही संधी दवडू नका. आजच अर्ज करा आणि तुमच्या करिअरच्या नव्या प्रवासाची सुरुवात करा!