
LCB ची कारवाई; घरगुती गॅस वाहनात भरत होते; मोताळ्यात दोघांच्या मुसक्या आवळल्या
MH 28 News Live, मोताळा : अवैधरित्या वाहनात गॅस भरणाऱ्या दोघांना बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्यांच्या ताब्यातून गॅस भरण्याचे साहित्य व गॅस सिलिंडर जप्त केले. काल, २३ मार्चला दुपारी दोनच्या सुमारास ही कारवाई मोताळा शहरातील नांदुरा रोडवरील आदर्शनगरात करण्यात आली.
मोताळ्यात अवैधरित्या वाहनात घरगुती गॅस भरण्यात येत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. माहितीच्या आधारे पथकाने छापा मारला असता आदर्शनगरातील प्रमोद पारस्कर आणि जुना मलकापूर रोडवरील शेख सलमान या दोघांकडून सात गॅस सिलिंडर आणि दोन कॉम्प्रेसर मशीन मोटारसह, दोन नोजेल पाईप, दोन इलेक्ट्रीक वजन काटे असे वाहनात गॅस भरण्याचे साहित्य असा एकूण ६७ हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.
पोलिसांनी गॅस सिलिंडर आणी वाहनात गॅस भरण्याच्या साहित्यासह प्रमोद पारस्कर आणि शेख सलमान या दोघांना अटक केली. दोघांविरुद्ध बोराखेडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त (खामगाव), अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे (बुलडाणा) यांच्या मार्गदर्शनाझाली व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बळीराम गीते यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरिक्षक अमित वानखडे, सहायक पोलीस निरिक्षक मनीष गावंडे, पोलीस अंमलदार राजेंद्र टेकाळे, गणेश पाटील, गजानन गोरले, प्रवीण पडोळ, मधुकर रगड यांनी पार पाडली.



