
साखरखेर्डा–दुसरबीड रस्ता निकृष्ट कामामुळे धोक्यात; दोषींवर कारवाई करा, अन्यथा आंदोलन अटळ
MH 28 News Live / साखरखेर्डा : साखरखेर्डा – दुसरबीड मार्गावरील रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. तांत्रिक नियमांचे उघड उल्लंघन करून काम सुरू असल्याने भविष्यात हा रस्ता अल्पावधीतच खराब होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे संबंधित कामाची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा १५ ऑगस्टपासून सार्वजनिक बांधकाम विभाग, बुलढाणा येथे आमरण उपोषण छेडण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
माहितीनुसार, रस्त्याच्या कामात डीएलसी (DLC) पूर्ण झाल्यानंतर त्यावर नियमानुसार पाणी मारून किमान चार ते आठ दिवस क्युरिंग करणे बंधनकारक असते. त्यानंतरच पुढील पीकेओसी (PKOC) व इतर कामांना सुरुवात केली जाते. मात्र, संबंधित ठेकेदाराने हे सर्व तांत्रिक नियम धाब्यावर बसवत डीएलसी झाल्याच दिवशी त्यावर मुरूम टाकून पुढील काम सुरू केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे रस्त्याच्या टिकाऊपणावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. जानेफळ–मेहकर मार्गाप्रमाणे हा रस्ताही काही काळात तडे जाऊन निकृष्ट ठरण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
याशिवाय साखरखेर्डा–शेंदुर्जन मार्गावरील अनेक ठिकाणी रस्त्याचे पॅचेस अपूर्ण अवस्थेत सोडण्यात आले आहेत. काही भागात काम अर्धवट ठेवण्यात आल्यामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून अपघाताचा धोका वाढला आहे. हे पॅचेस तातडीने पूर्ण न केल्यास गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
रस्त्याचे काम सुरू असताना दोन्ही बाजूंनी वाहतूक सुरळीत राहील, अशी व्यवस्था करणे आवश्यक असते. मात्र, अनेक ठिकाणी एकाच बाजूने वाहतूक सुरू ठेवून दुसरी बाजू खोदून ठेवण्यात आली आहे. त्यामुळे समोरासमोर दोन मोठी वाहने आल्यास अपघात होण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. नागरिकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.
संबंधित अधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाने घटनास्थळी प्रत्यक्ष पाहणी करून रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेची चौकशी करावी, निकृष्ट काम तात्काळ थांबवून नियमानुसार दर्जेदार कामाची अंमलबजावणी करावी, अपूर्ण पॅचेस पूर्ण करावेत आणि दोषी ठेकेदारासह जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा १५ ऑगस्टपासून सार्वजनिक बांधकाम विभाग, बुलढाणा येथे आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.



