
MH 28 News Live / चिखली : काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष तथा चिखलीचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी आपल्या समर्थकांना केलेला भावनिक व्हॉइस मेसेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर चिखलीच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. या संदेशातून त्यांनी पक्ष, जात, धर्म किंवा परिस्थितीच्या पलीकडे जाऊन आपल्यासोबत राहिलेल्या समर्थकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली असून, “तुम्ही त्यापैकीच एक आहात. पुढे परिस्थिती कोणतीही असो, आपल्यातलं हे नातं आणि एकमेकांवरचा विश्वास कायम राहावा,” अशी मनापासून इच्छा व्यक्त केली आहे. त्यांच्या या भावनिक संवादाचा राजकीय अर्थ लावला जात असून, गेल्या काही काळापासून सुरू असलेल्या त्यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाच्या चर्चेला या संदेशामुळे पुन्हा हवा मिळाली आहे. हा संदेश काँग्रेसला निरोप देण्याचा संकेत आहे की केवळ समर्थकांशी असलेले भावनिक नाते व्यक्त करणारा संवाद, याबाबत आता चिखलीच्या राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क मांडले जात आहेत.
“परिस्थिती कोणतीही असो, आपल्यातलं नातं कायम राहावं”
राहुल बोंद्रे यांनी आपल्या समर्थकांशी संवाद साधताना म्हटले, “राजकारणाच्या माझ्या प्रवासात मला अनेक माणसं भेटली, अनेक अनुभव आले. पण काही माणसं अशी आहेत जी जात, धर्म, पक्ष किंवा परिस्थिती पाहून नाही, तर अत्यंत विश्वासाने व निस्वार्थपणे माझ्यासोबत उभी राहिली. तुम्ही त्यापैकीच एक आहात. कदाचित प्रत्येक वेळी हे बोलून दाखवता आलं नसेल, पण माझ्या प्रत्येक चांगल्या-वाईट काळात अत्यंत विश्वासाने तुमची मोलाची साथ मला लाभली. पुढे परिस्थिती कोणतीही असो, आपल्यातलं हे नातं आणि एकमेकांवरचा विश्वास कायम राहावा, एवढीच मनापासून इच्छा.” बोंद्रे यांच्या या शब्दांमुळे त्यांच्या समर्थकांमध्ये भावनिक वातावरण निर्माण झाले असून, हा संदेश नेमका कोणत्या राजकीय पार्श्वभूमीवर देण्यात आला, याचीही चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सातत्याने सुरू आहेत. यापूर्वी अनेकदा प्रवेशाची तारीख निश्चित झाल्याचे सांगितले गेले; मात्र प्रत्यक्षात पक्षप्रवेश झाला नाही. त्यामुळे यावेळीही समर्थकांपासून राजकीय निरीक्षकांपर्यंत सर्वांचे लक्ष बोंद्रे यांच्या पुढील भूमिकेकडे लागले आहे.
२२ नोव्हेंबरचा मुहूर्त खरा की पुन्हा ‘तारीख पे तारीख’?
राहुल बोंद्रे यांच्या भाजप प्रवेशाबाबत गेल्या दोन महिन्यांत चार-पाच वेळा वेगवेगळ्या तारखा चर्चेत आल्या. प्रत्येक वेळी बोंद्रे यांनी याबाबत मौन राखले. या काळात समर्थक, काँग्रेस कार्यकर्ते आणि स्थानिक राजकीय पदाधिकाऱ्यांसोबत बैठकांचे सत्र सुरू असल्याची चर्चा होती. भाजप प्रवेशाबाबत काही अटी-शर्ती आणि भविष्यातील राजकीय भूमिकेबाबत चर्चा झाल्याचेही राजकीय वर्तुळात बोलले जात होते. आता मात्र त्यांच्या भावनिक संदेशामुळे या चर्चेला अधिकच बळ मिळाले आहे. दरम्यान, २२ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राहुल बोंद्रे काँग्रेसची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश करणार, अशी चर्चा त्यांच्या समर्थकांकडून सोशल मीडियावर अप्रत्यक्षपणे सुरू आहे. या चर्चेत किती तथ्य आहे, हे अधिकृत घोषणेनंतरच स्पष्ट होईल. त्यामुळे सध्या चिखलीच्या राजकीय वर्तुळात एकच प्रश्न घुमत आहे—यावेळी खरोखरच ‘फिक्स’ समजायचे की पुन्हा एकदा ‘तारीख पे तारीख’च ?



