
पाऊस गायब, पालकमंत्रीही गायब ! पालकमंत्री शोधा, बक्षीस मिळवा !… ४५ दिवस पाऊस गायब, दीड महिन्यापासून पालकमंत्री आणि सह पालकमंत्रीही ‘जिल्हाबाहेर’; राष्ट्रवादीची खामगाव पोलिसांत तक्रार
MH 28 News Live / खामगाव : जिल्ह्यात पावसाने दडी मारली, पिके सुकू लागली, वीजपुरवठ्याचा प्रश्न कायम असताना आता बुलढाण्याचे पालकमंत्री मकरंद पाटील आणि सहपालकमंत्री संजय सावकारे यांच्या ‘गायब’ होण्याचा राजकीय मुद्दा रंगला आहे. गेल्या दीड महिन्यापासून दोन्ही मंत्री जिल्ह्यात फिरकले नसल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी थेट खामगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यामुळे ‘शेतकरी पावसाची वाट पाहतोय आणि कार्यकर्ते पालकमंत्र्यांची!’ अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे.
राज्यातील १८ जिल्हे दुष्काळसदृश म्हणून जाहीर झाले असताना बुलढाणा जिल्ह्याचा त्यात समावेश न झाल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. जिल्ह्यात तब्बल ४५ दिवसांपासून पावसाचा पत्ता नसल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर पिके सुकत आहेत. मात्र, या संकटाच्या काळात जिल्ह्याचे पालकमंत्री कुठे आहेत, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष संजय बगाडे यांनी ‘पालकमंत्री शोधून द्या’ अशी मागणी करत राजकीय टोला लगावला. दरम्यान, चिखली तालुक्यातील कवठळ परिसरात पावसाअभावी पिकांची अवस्था बिकट झाली आहे. त्यातच अनियमित वीजपुरवठ्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. संकटातून मार्ग काढण्यासाठी गावातील महिलांनी डोक्यावर पाण्याचे हांडे घेत मिरवणूक काढली आणि ‘धोंडी धोंडी पाणी दे…’ अशी आर्त हाक दिली. महादेवाला जलाभिषेक करून पाऊस पडावा आणि सुकत चाललेल्या पिकांना जीवदान मिळावे, अशी प्रार्थनाही करण्यात आली.
महिलांनी प्रशासनालाही धारेवर धरत शेतांच्या बांधावर जाऊन तातडीने पंचनामे करण्याची मागणी केली. पिके पूर्णपणे वाळल्यानंतर मदतीचे कागदी घोडे नाचवण्यापेक्षा आताच परिस्थितीची पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरघोस मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली. शेतीसाठी सुरळीत वीजपुरवठा करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. एकीकडे शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसला आहे, तर दुसरीकडे विरोधक पालकमंत्र्यांचा शोध घेत आहेत. त्यामुळे बुलढाण्यात सध्या ‘पाऊस कुठे गेला?’ आणि ‘पालकमंत्री कुठे गेले ?’ या दोन प्रश्नांचीच चर्चा रंगली आहे.



