♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

डोणगावमध्ये वाढदिवसाच्या नावाने लहान मुलांना वाटले जाते ‘ गोड विष ‘ अन्न व औषध प्रशासन लक्ष देईल काय ?

MH 28 News Live / डोणगाव : शाळा म्हणजे केवळ ज्ञानदानाचे केंद्र नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या आरोग्यदायी सवयी आणि संस्कारांची जडणघडण करणारे महत्त्वाचे ठिकाण आहे. मात्र, डोणगाव परिसरातील शाळांमध्ये वाढदिवसाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना चॉकलेट, कॅन्डी, पेस्ट्री तसेच विविध गोड पदार्थ वाटण्याच्या वाढत्या प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. गावातील प्रतिष्ठित नागरिक, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य तसेच विद्यार्थी स्वतः वाढदिवसानिमित्त हे पदार्थ वाटत असताना शाळा प्रशासन आणि पालकांकडून त्याकडे पुरेसे गांभीर्याने पाहिले जात नसल्याची चिंता व्यक्त होत आहे.

 

आकर्षक वेष्टनात उपलब्ध असलेले रंगीबेरंगी चॉकलेट आणि कॅन्डी दिसायला मोहक असले तरी त्यातील साखरेचे प्रमाण, कृत्रिम रंग, टिकवणारे घटक आणि इतर पदार्थांची गुणवत्ता हा चिंतेचा विषय आहे. विशेषतः लहान मुलांकडून अशा पदार्थांचे वारंवार सेवन झाल्यास दात किडणे, लठ्ठपणा, ॲलर्जी, पचनाच्या समस्या आणि भविष्यात मधुमेहासारख्या आजारांचा धोका वाढू शकतो. त्यामुळे ‘वाढदिवसाची छोटीशी भेट’ म्हणून दिल्या जाणाऱ्या या पदार्थांकडे केवळ आनंदाचा भाग म्हणून न पाहता विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.

याशिवाय काही ठिकाणी स्थानिक किंवा अपरिचित ब्रँडच्या खाद्यपदार्थांचे वाटप केले जाते. अशा पदार्थांवर उत्पादनाची तारीख, मुदत समाप्तीची तारीख, घटकांची माहिती आणि अन्नसुरक्षेशी संबंधित आवश्यक तपशील स्पष्टपणे नमूद आहेत का, याची खातरजमा होणे आवश्यक आहे. शाळेच्या आवारात विद्यार्थ्यांना कोणते खाद्यपदार्थ दिले जात आहेत, त्यांची गुणवत्ता काय आहे आणि ते अन्नसुरक्षा नियमांनुसार आहेत का, याची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी होत आहे.

शाळांमध्ये जंक फूड आणि अस्वास्थ्यकर खाद्यपदार्थांपासून विद्यार्थ्यांना दूर ठेवण्याबाबत अन्नसुरक्षा यंत्रणेकडून वेळोवेळी मार्गदर्शक सूचना दिल्या जातात. मात्र, प्रत्यक्ष शाळांमध्ये वाढदिवसाच्या निमित्ताने वर्गशिक्षक आणि इतरांच्या उपस्थितीत चॉकलेटचे वाटप सुरू असल्याचे चित्र असेल, तर नियमांची अंमलबजावणी कितपत होते, हा प्रश्न उपस्थित होतो. वाढदिवस साजरा करण्यास विरोध नसून, त्यासाठी विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम करणारे पदार्थ वाटण्याची पद्धत बदलणे आवश्यक आहे. त्याऐवजी फळे, पुस्तके, शैक्षणिक साहित्य किंवा आरोग्यदायी पर्याय देण्याची संस्कृती रुजवण्याची गरज आहे.

या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने शाळांच्या परिसरातील खाद्यपदार्थांची तपासणी करावी, वाढदिवसानिमित्त वाटल्या जाणाऱ्या चॉकलेट व इतर गोड पदार्थांची गुणवत्ता तपासावी आणि नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. मोठ्या दुकानांपुरती किंवा सणासुदीपुरती कारवाई मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित अशा संवेदनशील ठिकाणीही FDAची नियमित नजर असणे गरजेचे आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129