
जांबुवंती नदीपात्रातील बेकायदेशीर अतिक्रमणे व बांधकामांवर कारवाईची मागणी; नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना तक्रार अर्ज दाखल
MH 28 News Live / चिखली : शहर हद्दीतील जांबुवंती नदीच्या पात्रात व पूरनियंत्रण रेषेच्या आत शासकीय नियमांचे उल्लंघन करून बेकायदेशीर ले-आऊट व बांधकामे सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या अवैध प्रकारामुळे भविष्यात मोठ्या प्रमाणावर पूरपरिस्थिती व पर्यावरणाची हानी होण्याची भीती व्यक्त करत, संबंधित दोषींवर तातडीने कायदेशीर कारवाई करण्याची मागणी स्थानिक पत्रकारांच्या वतीने नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चिखली शहरातून वाहणाऱ्या जांबुवंती नदीच्या काठावर गेल्या काही वर्षांपासून बिनदिक्कतपणे बेकायदेशीर ले-आऊट पाडून प्लॉटची विक्री सुरू आहे. विशेषतः सर्व्हे क्रमांक ५४ आणि ८७ मध्ये ले-आऊट तयार करताना जलसंपदा व नगररचना विभागाच्या पूरनियंत्रण रेषेच्या शासकीय नियमांना पूर्णपणे धाब्यावर बसवण्यात आले आहे. नदीच्या पात्रात थेट भराव टाकून प्लॉटींग करण्यात आली असून, त्यावर आता मोठमोठी बांधकामेदेखील पूर्ण झाली आहेत.
जीव धोक्यात आणि पर्यावरणाचा ऱ्हास
नदीपात्रातील अतिक्रमणामुळे नदीचा नैसर्गिक प्रवाह बाधित होत आहे. शासकीय नियमांची पायमल्ली करून करण्यात आलेल्या या प्लॉटींगमुळे संभाव्य प्लॉटधारकांचा आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांचा जीव धोक्यात सापडला आहे. पावसाळ्यात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास मोठी जीवित व वित्तहानी होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
मुख्याधिकाऱ्यांकडे सखोल चौकशीची मागणी
यापूर्वी १६ फेब्रुवारी २०२४ रोजी देखील नगर परिषद मुख्याधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले होते. मात्र, तरीही योग्य ती कारवाई न झाल्याने पुन्हा एकदा तक्रार अर्ज सादर करण्यात आला आहे. नगर परिषद प्रशासनाने या संपूर्ण नियमबाह्य प्रकरणाची सखोल चौकशी करावी, नदीपात्रातील भराव व बांधकामे तातडीने हटवावीत आणि दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी ठाम मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात मानवनिर्मित आपत्तीला तोंड द्यावे लागेल, असा इशाराही तक्रारदारांनी दिला आहे.



