
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी
MH 28 News Live / मेहकर : समृद्धी महामार्गावर आज पहाटे झालेल्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. डोणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुंबई कॉरिडॉरवर हा अपघात घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, आज दि. ७ सप्टेंबर रोजी पहाटे ५. १० वाजेच्या सुमारास मुंबई कॉरिडॉरच्या चॅनल क्रमांक २६३ वर ही घटना घडली. GJ03PD9004 क्रमांकाची कॅंडी व्हाईट रंगाची Skoda Slavia कार नागपूरकडून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात जात होती. पुढे जात असलेल्या एका अज्ञात वाहनाला या कारने पाठीमागून जोरदार धडक दिली आणि त्यानंतर कारवरील नियंत्रण सुटून ती थेट डिव्हायडरवर जाऊन आदळली.
या भीषण धडकेत कार चालक हिरेन रमेशभाई सिद्धपुरी (रा. राजकोट, गुजरात) यांचा जागीच मृत्यू झाला, तर कारमधील तुषार मकवाना आणि वीरेन सिद्धपुरी हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती पहाटे 5.15 वाजता CRO छत्रपती संभाजीनगर यांनी फोनद्वारे समृद्धी महामार्ग उपकेंद्राला दिली. माहिती मिळताच HC 2104, 71, 1962, 523, चालक PC 2611 आणि MSF चे दोन जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
जखमींना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे मेहकर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. पोलिसांनी अपघातग्रस्त कार बाजूला करून बॅरिगेटिंग केले असून महामार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरळीत करण्यात आली आहे. याप्रकरणी डोणगाव पोलीस पुढील तपास करत आहेत.



